वाघोली : वाघोली येथील बाईफ रोड परिसरात डम्परने दुचाकीला दिलेल्या धडकेमध्ये दुचाकीवरील महिला डम्परच्या चाकाखाली सापडल्याने जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी डम्परचालकासह मालकावर वाघोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाईफ रोड परिसरात आयडीबीआय बँकेजवळ डम्परने दुचाकीला धडक दिल्यानंतर दुचाकीवरील रुपाली सूरज तिवारी (वय २७, रा. पार्थ व्हिलाज, बाईफ रोड) या डम्परच्या चाकाखाली सापडल्याने त्यांना शंभर फूट फरफटत नेले होते. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यांची तीन वर्षांची बाळ आणि तिवारी यांचे पती देखील जखमी झाले होते. सूरज शिवकुमार तिवारी यांच्या फिर्यादीनंतर वाघोली पोलिसांनी डम्पर चालक शुभम सुदाम मस्के (वय २५, रा. लोणीकंद) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच मस्के या तरुणाकडे वाहन चालविण्याचा परवाना नसताना वाहन ताब्यात देऊन, प्रशासनाच्या नियमानुसार जड वाहनास प्रतिबंधित रोडवर वाहन चालविण्यास प्रोत्साहन केल्याप्रकरणी डंपर मालक प्रमोद भाडळे (रा. वाघोली) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या अपघाताचा पुढील तपास वाघोली पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक युवराज हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली वाघोली पोलिस करत आहेत.