Narendra Modi Pune Visit: नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी पवार, ठाकरे उपस्थित राहणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2022 13:45 IST2022-03-04T13:45:17+5:302022-03-04T13:45:25+5:30
पुण्यात सत्ताधारी भाजपकडून मोदींच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे

Narendra Modi Pune Visit: नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी पवार, ठाकरे उपस्थित राहणार?
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ६ मार्चला पुण्यात येणार आहेत. सत्ताधारी भाजपकडून मोदींच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांवर शुभेच्छांचे बॅनरही लावण्यात आले आहेत. त्याबरोबरच पुणे दौऱ्यात ज्या मार्गाने मोदी जाणार आहेत. तेथील रस्ते दुरुस्ती करण्याबरोबरच रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविणे, रस्ते स्वच्छ करणे, ओव्हर हेड केबल काढण्यासाठी महापालिकेची प्रशासकीय यंत्रणेकडून कार्यात आली आहेत.
महापालिकेच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण त्यांच्या हस्ते होणार असून, त्यानंतर गरवारे महाविद्यालय ते आनंदनगर असा मेट्रो प्रवास व त्याचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर कोथरूड येथील एमआयटी कॉलेजच्या मैदानावर पंतप्रधानांची सभा व अन्य ऑनलाइन उद्घाटन कार्यक्रम होणार आहेत.
या कार्यक्रमासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार उदयनराजे भोसले, जपानचे भारतातील राजदूत सातोशी सुझुकी, केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाचे सचिव तसेच राज्याचे मुख्य सचिवांसह इतर उच्चपदस्थ अधिकारी, 'महामेट्रो'चे ब्रिजेश दीक्षित, भाजपचे प्रदेशाध्यक्ष तसेच कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील, शहरातील सर्व खासदार, आमदार यांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.
राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात सुरु असलेल्या शीतयुद्धाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार कि नाही ही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. पण मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्याकडून अद्याप काहीच कळवण्यात आलेले नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौरा
६ मार्च
- सकाळी ११ वाजता लोहगाव विमानतळावर आगमन
- हेलिकॉप्टरने पोलीस मुख्यालय मैदान
- पुणे महापालिका भवन येथे शिवाजी महाराज पुतळ्याचे उद्घाटन
- गरवारे मेट्रो उदघाटन
- मेट्रोने आनंदनगर पर्यंत प्रवास
- एमआयटी कॉलेज मैदान येथे जाहीर सभा
- हेलिकॉप्टरने लव्हळे सिंबायोसिस कॉलेज येथे भेट
- दुपारी २ वाजता दिल्लीकडे रवाना