PMC Elections: सर्वच घटकातील नागरिकांना अर्धवेळ रोजगार देणार; पुणे महापालिका निवडणुकीसाठी 'आप' ची पहिली गॅरंटी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 15:18 IST2025-10-16T15:16:38+5:302025-10-16T15:18:42+5:30
PMC Elections 2025: सत्ता आल्यानंतर रोजगार न दिल्यास, जेलमध्ये घालण्याची आम आदमी पक्षाचे उमेदवार व्हिडिओ शपथ ही घेणार असल्याचेही सांगितले

PMC Elections: सर्वच घटकातील नागरिकांना अर्धवेळ रोजगार देणार; पुणे महापालिका निवडणुकीसाठी 'आप' ची पहिली गॅरंटी
पुणे: महापालिका निवडणूकीसाठी आम आदमी पक्षाने (आप) पुणेकरांना रोजगाराचे आश्वासन दिले आहे. सत्ता आल्यानंतर दिल्ली व पंजाबच्या धर्तीवर सर्वच घटकातील नागरिकांना अर्धवेळ रोजगार देण्याची घोषणा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केली.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम आयोगाने जाहीर केला आहे. पुणे महापालिकेची प्रभाग रचना अंतिम करून प्रशासनाने मतदार याद्या जाहीर केल्या आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर आप च्या वतीने नुकतीच पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे, महिला अध्यक्षा सुरेखा भोसले, अजय मुनोत, निरंजन अडागळे, प्रशांत कांबळे, किरण कद्रे, अक्षय शिंदे, बालाजी कंठेकर उपस्थित होते.
आप पक्ष राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण ताकतीने आणि स्वबळावर लढवणार आहे. आम्ही पुणेकरांना रोजगार आणि महागाईतून दिलासा देवून राजकारणाला सकारात्मक दिशा देणारी रोजगार योजना आणली आहे. या योजनेद्वारे पुणे महापालिकेत सत्ता आल्यावर, फारसे न शिकलेल्यांना अर्धवेळ रोजगार दिले जाणार आहेत. दोन ते तीन तासांच्या कामासाठी, महिना दहा हजार वेतन असेल, शिक्षणाची अट नसेल, लिहिता वाचता येणे गरजेचे, यासाठी सर्व पुणेकर मतदार यासाठी पात्र असतील, मात्र, एका घराताल एकाच व्यक्तीला नोकरी देण्यात येईल, या रोजगार योजनेसाठी पुणेकरांवर कुठलाही भार टाकला जाणार नाही, किंवा कर वाढवला जाणार नाही, असे आपच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. सत्ता आल्यानंतर रोजगार न दिल्यास, जेलमध्ये घालण्याची आम आदमी पक्षाचे उमेदवार व्हिडिओ शपथ ही घेणार असल्याचेही सांगितले.