पुणे: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यासंदर्भांत लोकमतने मुलाखत घेत निकम यांच्याशी संवाद साधला.
- तुमची नियुक्ती व्हावी म्हणून मस्साजोगचे नागरिक, संतोष देशमुखांचे जे कुटुंबीय आहेत ते अन्नत्याग आंदोलन करत होते. आता तुमची नियुक्ती झालेली आहे. संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना आणि नागरिकांना काय आश्वासित कराल?
निकम म्हणाले, निश्चितपणे मी ग्रामस्थ सरपंच देशमुख यांचे कुटुंबीय यांचा मनःपूर्वक आभारी आहे. कारण त्यांनी जो माझ्यावरती विश्वास आणि अतूट प्रेम दाखवलं ते निश्चित माझ्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचं आहे. मी हा खटला चालवण्यासाठी काल माननीय मुख्यमंत्री महोदय यांना विनंती केली. की मी खटला चालवण्यास तयार आहे त्यांनी संमती दिली. त्याप्रमाणे त्यांनी ते आदेश पारित केले. मुख्यमंत्री महोदय यांनी यापूर्वी देखील हा खटला चालवून मला सूचित केलं होत. परंतु मी त्यांना त्यावेळेला नम्रपणे नकार दिला होता. परंतु पुन्हा ग्रामस्थांचं हे हरताळा आंदोलन बघून मला अतिशय वाईट वाटलं. की आपल्यावरती एवढे लोक प्रेम करतात. आपण त्यांच्या प्रेमाला निश्चित दाद दिली पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून माणुसकीच्या भावनेतून मी त्यांना सांगितलं की मी तुमचा खटला चालवेन. अर्थात माझं कामकाज हे तपास यंत्रणेने न्यायालयात आरोपपत्र दाखल केल्यानंतरच सुरू होईल. त्याच्यानंतरच मला त्यावरती भाष्य करता येईल.
- नियुक्तीनंतर विरोधकांची टीका देखील आता होऊ लागली आहे. त्यांना काही उत्तर? निकम म्हणाले, नाही जर एक चांगली टीका असती तर मी त्याला उत्तर दिलं असतं. पण ज्या पद्धतीने ते टीका करतायेत या बालिश टीका आहेत. राजकीय विरोधकांनी एक बाब लक्षात ठेवली पाहिजे. की आपण टीका करण्याच्या अगोदर आपला कायद्यावरचा अभ्यास देखील असला पाहिजे. त्याला कारण असं आहे. त्यांची भ्रामक कल्पना अशी झाली आहे की सरकारी वकील म्हंटल म्हणजे सरकारसोबत असणार असं नाहीये. सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी विधीत खटल्यात हेच बाब स्पष्ट केली आहे. की सरकारी वकील हा न्यायदान कार्यामध्ये न्यायालयाला मदत करणारा एक स्वतंत्र अधिकारी असतो. जरी त्याचं नाव सरकारी वकील असलं तरी न्यायालयात निर्भीड आणि निस्पृहपणे बाजू मांडण्याचं असतं. मी आतापर्यंत जे विविध खटले चालवले. महाराष्ट्रामध्ये ते याच पद्धतीने चालवले आहेत. परंतु मी एकदा भाजपाची निवडणूक लढवली म्हणून मी वासी झालो. असं ते जे सुतावरून स्वर्ग गाठतात हे चुकीचं आहे. अर्थात मी त्यांनाही दोष देत नाही. कारण प्रत्येकाच्या आकलन शक्तीचा हा परिणाम असतो. आणि त्याच्यातून ते अजून बाहेर येतील. अशी मला आशा आहे. नाही आली तरी मला फरक पडत नाही. कारण मी अशा याच्यामुळे कुठेही नाउमेद होत नाही.
- या प्रकरणामध्ये प्रामुख्याने तीन खटले आहेत. हे तीन खटले नेमके कसे आहेत? आणि आपण लढणार कसे आहोत?
निकम म्हणाले, हे तिघेही खटले स्वतंत्र दाखल झालेले आहेत. जो पहिला खटला खंडणीचा आहे, दुसरा मारामारीचा आहे. आणि तिसरा खुनाचा आहे. पोलीस तपास यंत्रणेने या तिन्ही खटल्यांचे चार्ज शीट दाखल केल्यानंतर माझं कामकाज सुरू होईल.
- जेव्हापासून हे प्रकरण समोर आलंय तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अ नागरिकांमध्ये आक्रोश पाहायला मिळतोय. तुम्ही अनेक खटले लढलेले आहात, याच्यामध्ये नेमकं आव्हान काय?
निकम म्हणाले, याच्या काय आव्हानं आहेत हे तपास यंत्रणेच्या गुणवत्तेवरूनच सांगता येईल. आज सांगता येणं कठीण आहे. कारण CID आणि SIT हा तपास करतायेत. आता तपास कुठपर्यंत गेलेला आहे. यावरती बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतील.