नसरापूर : पुणे जिल्ह्याच्या पूर्वेला असणाऱ्या व सातारा जिल्ह्याच्या हद्दी लगत सारोळा (ता. भोर) येथे नीरा नदीत एक मृतदेह आढळून आला होता. प्रियकराच्या मदतीने पत्नीने हा मृतदेह नदीत टाकल्याची कबुली मृताच्या पत्नीने दिली. अशी माहिती पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. सिद्धेश्वर भिसे असे त्या मृत व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी राजगड पोलिसांनी त्याची पत्नी योगिता (वय ३०) हिला ससानेनगर ,पुणे येथून, तर तिचा प्रियकर शिवाजी बसवंत सुतार (वय ३२) यास धाराशिव जिल्ह्यातून गुन्हा दाखल झाल्यानंतर मृताच्या शर्टाच्या टेलर टॅग वरून अवघ्या ८ तासांत अटक केली.
पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने नदीत फेकले
गेल्या ९ मार्च रोजी सारोळा, गावच्या हद्दीत नानाची वाडी नावाचे हॉटेलच्या कडेला निरा नदीच्या पात्रात सिद्धेश्वर भिसे यांचा हातपाय बांधून पोत्यात भरलेला मृतदेह मिळून आला. त्याच्या पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने गळा दाबून खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने, त्याचे हात व पाय बांधून, त्यास पांढरे, पिवळे व लाल रंगाचे प्लॅस्टिकच्या पोत्यात घालुन, निरा नदी पात्रात फेकुन दिले असल्याचे पोलिस तपासात समोर आले. भिसे याची पत्नी व तिच्या प्रियकराला राजगड पोलिसांनी याप्रकरणी अटक केली आहे.
हातावर गोंदवलेल्या ''ओम'' या शब्दावरून खुनाचा उलघडा
राजगड पोलिसांना मृतदेहाच्या हातावर गोंदवलेल्या ''ओम'' या शब्दावरून या वर्णनाचे कोणी बेपत्ता आहे काय, याबाबत पुणे शहर व जिल्ह्याच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होती. त्यावेळी ससाणेनगर येथील अशा वर्णनाची एक व्यक्ती बेपत्ता असल्याचे पोलिसांना माहिती मिळाली. तपासाअंती मृत व्यक्ती नाव सिद्धेश्वर असून त्याची पत्नी योगिता हिनेच ते बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली असल्याचे समोर आले. अनैतिक प्रेम संबंधामध्ये अडथळा खुनाच्या गुन्ह्यातील सिध्देश्वर बंडु भिसे हा त्याची पत्नी योगिता व तिचा प्रियकर शिवाजी बसवंत सुतार यांच्या असलेले अनैतिक प्रेम संबंधामध्ये अडथळा निर्माण करत असल्याच्या कारणावरून भिसे यांचा खून केला. त्यांचे हात-पाय हे साडीच्या चिंधीने बांधुन मृतदेह एका प्लॅस्टिकचे पोत्यात भरून निरा नदीच्या पात्रात फेकुन दिल्याचे तपासात निश्पन्न झाले आहे.