नावातच ‘राष्ट्र’ शब्द असताना संघ हिंदू समाजापुरता बंदिस्त का? भय्याजी जोशी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2019 12:54 IST2019-04-10T12:48:21+5:302019-04-10T12:54:44+5:30
देशाचे नुकसान हे सज्जन शक्तीच्या निष्क्रियतेनेच झाले आहे. हीच निष्क्रियता झटकून हिंदू समाजाला सक्रिय करायचे आहे.

नावातच ‘राष्ट्र’ शब्द असताना संघ हिंदू समाजापुरता बंदिस्त का? भय्याजी जोशी
 पुणे :  ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’ च्या नावात  ‘राष्ट्र’ हा शब्द असतानाही संघाने हिंदू समाजापुरतेच का स्वत:ला बांधून घेतले. हा विपर्यास आणि विसंगती आहे असे नेहमीच म्हटले जाते. मात्र या देशाचे उत्थान आणि पतन हे हिंदुमुळेच झाले. त्यांना उभे करणे हेच आमचे काम आहे. देशाचे नुकसान हे सज्जन शक्तीच्या निष्क्रियतेनेच झाले आहे. हीच निष्क्रियता झटकून हिंदू समाजाला सक्रिय करायचे आहे. धर्माचे रक्षण केल्यानेच हा देश परम वैभवाला जाणार आहे, अशा शब्दात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी संघावर होणा-या टिकेला प्रत्युत्तर दिले. 
    स्नेहल प्रकाशनच्या वतीने रामकृष्ण पटवर्धन लिखित ' राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एक विशाल संघटन' पुस्तकाचे प्रकाशन  भय्याजी जोशी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध उद्योगपती अरुण फिरोदिया, एअरमार्शल भूषण गोखले (निवृृत्त) प्रकाशक रवींद्र घाटपांडे, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्त्रबुद्धधे, लेखक रामकृष्ण पटवर्धन आणि जयंत रानडे उपस्थित होते. 
    संघाचे संघटन कौशल्य आगामी काळात सांभाळणं हेच मोठे आव्हान असल्याचे सांगून भय्याजी जोशी यांनी संघाची कार्यपद्धती विशद केली. ते म्हणाले,  व्याप्ती, स्वयंसेवक किती, भौगोलिक क्षेत्र हे संघाचे मापदंड असले तरी संघाची काही वैशिष्ट्य आहेत. हजारो वर्षे समाज परिवर्तनाचे प्रयत्न झाले त्यात संघ जोडला गेला. संस्था स्थापनेच्या साचेबद्ध पद्धती डावलून संघाचे काम सुरू झाले. संघाचे काम करताना प्रारंभ कर्त्याची एक दृष्टी असते सरसंघचालकांनी आराखडा देण्यापेक्षा लक्ष्य दिले.  संघ शक्तिशाली, विचारांनी प्रेरित आणि निष्क्रियता सोडून सक्रिय झाला पाहिजे. धर्माचे रक्षण करण्यासाठी संघ विचार महत्त्वाचा आहे.समाज कालप्रवाहात जागृत राहिला नाही तर काय होते? याचे उदाहरण भारत आहे.  विचार विमानातून चालला आहे आणि आचरण बैलगाडीतून चालले आहे असे होता कामा नये.  आचरणात आणता येत नाही ते सिद्धांतच नाहीत. एक निर्दोष समाज उभा करायचा आहे हे दोष दूर करण्यासाठी पुरुषार्थ निर्माण केला पाहिजे. आम्ही मुस्लिम ख्रिश्चन विरोधी आहात का? तर नाही. कुणाच्या विरोधात नाही  केवळ हिंदू समाजातील दोष दूर करायचा आहे. सकारात्मक दृष्टीकोन घेऊन जात आहोत. हिंदू संघाच्या शाखेवर येईल अशी आमची धारणा नाही. पण किमान नेतृत्व निर्माण करीत आहोत. समाजात  एकरूप झालेली व्यक्ती निर्माण करणे हे आमचे काम आहे. आदर्शाच्या मागे लोक उभे राहतात अशी मंडळी गावोगावी निर्माण करणे ही संघाची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.  
    आपले ' आदेश' काय आहेत यामधील  ‘आदेश’  या शब्दाला संघाने तिलांजली दिली आहे. आपली इच्छा काय आहे. समाजासाठी मीच काम केले पाहिजे .स्वयंसेवक कुठलीही गोष्ट स्पर्धेसाठी करीत नाहीत.  धार्मिक नेतृत्ब सामाजिक परिवर्तनात सहभागी झाले पाहिजे याकडे त्यांनी लक्ष वेधले. 
    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्याम भुर्के यांनी केले.
--------------------------------
चौकट
१९९२ मध्ये अयोध्येतील ’ वादग्रस्त’ ढाचा आम्ही पडला असा गैरसमज आमचाही अनेक वर्षे होता. पण, हिंदू समाजाच्या जागरणातून हे घडले असे संघ मानतो अशी पृष्टी भय्याजी जोशी यांनी जोडली.