साहित्यपिठावर राजकारणी कशाला? प्रश्न विचारणाऱ्या मराठी साहित्याला राजकारण्यांचे असणे पडले अंगवळणी
By राजू इनामदार | Updated: January 31, 2025 18:00 IST2025-01-31T17:58:18+5:302025-01-31T18:00:33+5:30
मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री पवार व शिंदे यांनी मोदी यांचे भरपूर कौतूक करत मराठी भाषेला अभिजात दर्जा त्यांच्यामुळेच मिळाला असल्याचे सांगितले

साहित्यपिठावर राजकारणी कशाला? प्रश्न विचारणाऱ्या मराठी साहित्याला राजकारण्यांचे असणे पडले अंगवळणी
पुणे: राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, त्यांच्यासोबत अन्य काही मंत्री. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर राजकारणी कशाला? असा खडा सवाल उच्च रवात काही वर्षांपूर्वी विचारणाऱ्या मराठी साहित्याला आता मात्र अशी राजकारण्यांची उपस्थिती अंगवळणी पडली असल्याचे दिसते आहे. फर्ग्यूसन महाविद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या मराठी विश्व साहित्य संमेलनाच्या उदघाटनाला व्यासपीठावर हजर असणारी राजकारण्यांची मांदियाळी हेच सांगत होती, त्याची चर्चाही संमेलनस्थळी रंगली होती.
सरकारचा मराठी भाषा विभाग व विश्व मराठी साहित्य संमलेन यांच्या वतीने या संमेलनाचे आयोजन केले जाते. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतरचे हे पहिलेच विश्व मराठी साहित्य संमेलन होते. आयोजनात सरकारच आहे म्हणून की काय किंवा मग मराठी अभिजात झाल्यानंतरचे पहिलेच म्हणून की काय, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संमेलनाचे उदघाटन झाले. ते तर आलेच, पण त्यांच्याबरोबर अजित पवार, एकनाथ शिंदे हे त्यांचे दोनही उपमुख्यमंत्रीही उदघाटनाला आले. उद्योगमंत्री असलेले उदय सामंत यांच्याकडे मराठी भाषा विभागही आहेच, त्यामुळे ते होते. नगरविकास विभागाच्या राज्यमंत्री माधरी मिसाळ होत्या, खासदार श्रीरंग बारणे, आमदार सिद्धार्थ शिरोळे हेही होते. व्यासपीठावरच्या या सर्व राजकीय गर्दीत संमेलनात साहित्य भूषण पुरस्कार देण्यात येणारे ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांच्याबरोबरच माजी साहित्य संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, सदानंद मोरे, रविंद्र शोभणे, राजा दीक्षित, साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष उषा तांबे हेही होते.
मराठी भाषेला अभिजात दर्जा केंद्र सरकारने हा दर्जा जाहीर केला असला तरी त्याची प्रतिक्षाही बराच काळ करावी लागली होती, मात्र त्याचा आता विसर पडला असल्याचे दिसते आहे. उलट हा दर्जा जाहीर केल्याचा राजकीय फायदा कसा घेता येईल याचाच विचार मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भाषणात दिसत होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांनी याचे पूर्ण श्रेय दिले व त्यासाठी पंतप्रधानांना समस्त मराठी जनतेच्या वतीने त्यांचे आभारही त्यांनी व्यक्त केले. सगळे श्रेय मुख्यमंत्र्यांनीच का घ्यावे म्हणून मग उपमुख्यमंत्री पवार व शिंदे यांनीही मोदी यांचे भरपूर कौतूक करत मराठी भाषेला अभिजात दर्जा त्यांच्यामुळेच मिळाला असे सांगितले.
फडणवीस, पवार, शिंदे यांच्या उपस्थितीमुळे त्यांच्यात्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारीही उदघाटनाला मोठ्या संख्येने उपस्थित होते. संमेलनस्थळाकडे येणाऱ्या रस्त्यांवर दोन्ही बाजूंनी या कार्यकर्त्यांनी आपापल्या नेत्यांचे स्वत:च्या छायाचित्रांसहितचे भले मोठे फलक झळकावले होते. त्यांच्या संख्या इतकी होती की साहित्य संमेलन आहे की एखाद्या राजकीय पक्षाचे अधिवेशन असा संभ्रम निर्माण व्हावा. संमेलनासाठी म्हणून आलेल्या काही रसिक साहित्यिक व वाचकांमध्ये याबाबतची बरीच कुजबूज सुरू होती.