पुण्यातील प्रभात रोडला टँकरने पाणीपुरवठा करण्याची का आली वेळ ? नागरिक म्हणतात...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 19:39 IST2021-02-16T19:36:32+5:302021-02-16T19:39:57+5:30
पुण्यातला प्रभात रस्ता डेक्कन परिसर हा सदर आणि सुखवस्तू भाग मानला जातो.

पुण्यातील प्रभात रोडला टँकरने पाणीपुरवठा करण्याची का आली वेळ ? नागरिक म्हणतात...
पुणे : पुणे शहरातील काही भागांमध्ये टँकरने पाणीपुरवठा केला जाणे ही बाब काही विशेष नाही. पण शहराच्या मध्यवर्ती भागात तेही चक्क प्रभात रोडला टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पाणीपुरवठामध्ये अडचण येत असल्याने तातडीने ही समस्या दूर करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. महापालिकेचे अधिकारी मात्र अजूनही नेमका प्रॉब्लेम काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न करत आहे.
पुण्यातला प्रभात रस्ता डेक्कन परिसर हा सदर आणि सुखवस्तू भाग मानला जातो. त्यामुळे या भागातल्या सोयी सुविधांकडे ही महापालिकेचे कायम लक्ष असते. काही अडचण आली तरी नागरी सुद्धा अत्यंत सहजपणे तो प्रश्न लोकप्रतिनिधींकडे मांडत असतात. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये नेमकी अडचण काय आहे हे समजत नसल्याने टँकर मागण्या पासून ते ओळखीच्या़कडून पाणी आणण्यापर्यंत ची वेळ नागरिकांवर आली आहे.
स्थानिक नागरिक असणाऱ्या गोडबोले 'लोकमत' शी बोलताना म्हणाल्या, गेल्या दोन आठवड्यांपासून आम्हाला हा प्रश्न भेडसावतो आहे. टँकर ते पाणी वापरताना अनेक अडचणी येतात. आमचा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा अशी मागणी आम्ही केली आहे.
याच परिसरात राहणारे आणखी एक स्थानिक नागरिक म्हणाले, अक्षरश: पहिल्या मजल्यावर देखील पाणी पोहोचत नाही. अनेकांनी पाईपलाईन बदलायला सुरुवात केली आहे. देखील पाण्याचा प्रश्न सुटत नाही. दोन वर्षांपूर्वी अशीच अडचण आम्हाला आली होती. एवढी परिस्थिती येण्याच्या आतच महापालिकेने उपाययोजना करावी.
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी अनिरुद्ध पावसकर यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले, याठिकाणी पाहणी करण्यासाठी अधिकाऱ्यांना पाठवले आहे. प्रेशरची अडचणी येत असल्यामुळे पुरवठ्यात अडचणी येत असाव्यात. मात्र तक्रारींचं निराकरण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.