धार्मिक भावनांचं इतरांच्या दारावर प्रदर्शन कशाला?, स्वत:पर्यंत मर्यादित ठेवा; शरद पवारांनी राणा दाम्पत्याला फटकारलं!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2022 13:00 IST2022-04-25T12:59:44+5:302022-04-25T13:00:32+5:30
प्रत्येकानं आपल्या धार्मिक भावना स्वत:पर्यंत मर्यादित ठेवायला हव्यात. धर्माबद्दल असलेल्या भावनांचं प्रदर्शन कशाला करायचं आणि धार्मिक भावना इतरांच्या दारावर कशाला न्यायच्या

धार्मिक भावनांचं इतरांच्या दारावर प्रदर्शन कशाला?, स्वत:पर्यंत मर्यादित ठेवा; शरद पवारांनी राणा दाम्पत्याला फटकारलं!
पुणे-
प्रत्येकानं आपल्या धार्मिक भावना स्वत:पर्यंत मर्यादित ठेवायला हव्यात. धर्माबद्दल असलेल्या भावनांचं प्रदर्शन कशाला करायचं आणि धार्मिक भावना इतरांच्या दारावर कशाला न्यायच्या?, असा सवाल उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राणा दाम्पत्याच्या हनुमान चालीसा पठणाच्या मुद्द्यावर टीका केली. ते पुण्यात बोलत होते.
"प्रत्येकाला धार्मिक भावना असतात. त्या प्रत्येकानं स्वत:पर्यंत मर्यादित ठेवायचला हव्यात. त्याचं प्रदर्शन करत इतरांच्या दारावर कशाला जायचं? अस्वस्थ असलेल्या लोकांकडून हे असले उद्योग केले जातात", असं शरद पवार म्हणाले.
"सत्ता येत जात असते. पण वैफल्यग्रस्तातून अशा कुरघोड्या करणं योग्य नाही. अशाप्रकराची परिस्थिती महाराष्ट्रात याआधी पाहिली नाही. सत्ता गेल्याने निर्माण झालेली अस्वस्थता यातून दिसून येते. सत्ता गेल्यानं अस्वस्थ होण्याचं कारण नाही. मी अनेकदा सत्ता गमावली आहे. मात्र त्यामुळे कधीही अस्वस्थ झालो नाही, असं पवार म्हणाले.
यावेळी त्यांनी १९८० मध्ये पुलोद सरकार बरखास्त झाल्याची आठवण करुन दिली. १९७८ मध्ये राज्यात पुलोदचं सरकार होतं. १९८० मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींच्या शिफारशीनंतर पुलोद सरकार बरखास्त करण्यात आलं. मात्र मी अस्वस्थ झालो नाही, अशी आठवण पवारांनी सांगितली.
सरकार बरखास्त करण्यात आल्याची माहिती मला मुख्य सचिवांकडून समजली. त्यानंतर मी माझ्या काही मित्रांना निवासस्थानी बोलवून घेतलं. सामानाची आवराआवर, बांधाबांध केली आणि दुसऱ्या ठिकाणी राहायला गेलो. तेव्हा वानखेडेवर भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी सामना सुरू होता. मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान सोडल्यावर मी कसोटी सामना पाहायला मैदानावर गेलो होतो, असं पवारांनी सांगितलं.