दीनानाथ प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांना शिक्षा होणारच; महिला आयोगाचा विश्वास

By राजू इनामदार | Updated: April 14, 2025 18:57 IST2025-04-14T18:56:30+5:302025-04-14T18:57:34+5:30

डॉ. घैसास यांना दिलेली नोटीस, रुग्णालय प्रशासनाने त्यांच्यावर केलेली कारवाई याबाबत कोणतीही स्पष्टता नाही

Whoever is guilty in Dinanath case will be punished; Women's Commission confident | दीनानाथ प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांना शिक्षा होणारच; महिला आयोगाचा विश्वास

दीनानाथ प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांना शिक्षा होणारच; महिला आयोगाचा विश्वास

पुणे: दीनानाथ रुग्णालयातील गर्भवती माता मृत्यू प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई होईल असा विश्वास राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी व्यक्त केला. ससून रुग्णालयाचा अहवाल आल्यानंतर संबधितांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होईल असे त्यांनी सांगितले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर चाकणकर यांनी पत्रकारांबरोबर संवाद साधला. दीनानाथ प्रकरणाची महिला आयोगाने तत्काळ दखल घेतली. महापालिका आयुक्त, पोलिस यांना सुचना दिल्या. त्याच दिवशी सायंकाळी भिसे कुटुंबांकडून अलंकार पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली. आता ससून रुग्णालयाचा या प्रकरणाचा अहवाल येणे बाकी आहे, तो मंगळवारी येणे अपेक्षित आहे, त्यानंतर या विषयावर सविस्तर माहिती दिली जाईल असे चाकणकर यांनी सांगितले.

महिला आयोग या प्रकरणाकडे गंभीरपणे पाहत आहे, पहिल्या दिवसापासून सातत्याने याचा पाठपुरावा करत आहे. आता माता मृत्यू समितीचा अहवाल, धर्मादाय आयुक्तांचा अहवाल मंत्रालयात सादर केला आहे. मंगळवारी ससून रुग्णालयाचा अहवाल मिळेल. यातून या प्रकरणाशी संबधित सर्वच गोष्टींवर प्रकाश पडणे अपेक्षित आहे. त्यानंतर लगेचच यासंबधी पुढील कार्यवाही होईल. यापुढे कोणतीही तनिषा भिसे ठरू नये या निर्धाराने आयोग काम करत असल्याचे चाकणकर यांनी सांगितले.

डॉ. घैसास यांना दिलेली नोटीस, रुग्णालय प्रशासनाने त्यांच्यावर केलेली कारवाई याबाबत कोणतीही स्पष्टता नाही. बातम्या आल्या त्यावरून काही बोलणे योग्य नाही. महाराष्ट्र मेडिकल कौन्सील यांना याबाबत आम्ही विचारणा केलेली आहे. या प्रकरणाचा संपूर्ण अहवाल आल्यानंतरच बोलता येईल असे चाकणकर म्हणाल्या. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय हे धर्मादाय रुग्णालय आहे, तिथे तसेच अन्य काही रुग्णालयांमध्येही तनिषा भिसे यांनी उपचार घेतले आहेत, त्यामुळे या सर्वच रुग्णालयांची माहिती अहवालात अपेक्षित आहे. या प्रकरणात सर्व लहानमोठ्या गोष्टींचा अभ्यास व्हावा, म्हणजे कोणत्याही धर्मादाय वा खासगी रुग्णालयात असे प्रकार घडू नये. 

Web Title: Whoever is guilty in Dinanath case will be punished; Women's Commission confident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.