घराणेशाही, गटबाजीत चिंचवडच्या नव्या मतदारांचा कौल कोणाला ?
By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: November 8, 2025 15:25 IST2025-11-08T14:58:51+5:302025-11-08T15:25:12+5:30
- अंतर्गत गणिते गुंतागुंतीची : अनधिकृत बांधकामांचा विषय ऐरणीवर; उच्चभ्रू सोसायट्यांतील आयटी कर्मचारी आणि बाहेरून आलेल्या कामगारांचा मिश्र मतदारसंघ

घराणेशाही, गटबाजीत चिंचवडच्या नव्या मतदारांचा कौल कोणाला ?
पिंपरी : महापालिकेच्या निवडणुकीत चिंचवड विधानसभा मतदारसंघ ‘हॉटस्पॉट’ ठरणार आहे. हिंजवडी आयटी पार्कला जोडलेला हा परिसर विकासाच्या झपाट्याने बदलणाऱ्या चेहऱ्याचे प्रतीक आहे. उच्चभ्रू सोसायट्यांतील आयटी कर्मचारी आणि काळेवाडी, वाल्हेकरवाडी, रहाटणी, चिंचवडगाव या पट्ट्यात बाहेरून आलेले कामगार अशा मिश्र मतदारांमुळे येथे निवडणुकीची गणिते नेहमीच गुंतागुंतीची राहिली आहेत.
अनधिकृत बांधकामे, नदीपात्रातील बांधकामे, वाहतूक कोंडी, असमतोल विकास हे स्थानिक आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय घराणेशाही आणि सोयीस्कर प्रभागरचनेवरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. घराणेशाही आणि नवे नेतृत्व, निष्ठावंत आणि आयाराम, स्थानिक आणि स्थलांतरित मतदार येथे पाहण्यास मिळत आहेत. त्यातच प्रत्येक पक्षात गटबाजी आहे. या पार्श्वभूमीवर चिंचवडच्या नव्या मतदारांचा कौल कोणाला मिळणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
शिंदेसेनेचे खासदार श्रीरंग बारणे या परिसरात राहत असून, प्रभाग रचनेत यांनी मुलगा आणि पुतण्यासाठी हस्तक्षेप केल्याची टीका झाली. बारणे यांच्या नात्यागोत्यांमुळे स्थानिक समीकरणांवर त्यांचा प्रभाव आहे. त्याचबरोबर आमदार शंकर जगताप यांचे नदीपलीकडील भागात वर्चस्व असून, गावकी-भावकीच्या राजकारणावर त्यांचा प्रभाव आहे.
जगताप घराण्याची आणि भाजपची पकड
शहराच्या राजकारणावर दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे पंधरा वर्षे वर्चस्व होते. त्यांच्या निधनानंतर पत्नी अश्विनी जगताप आणि आता बंधू शंकर जगताप नेतृत्व करीत आहेत. भाजपचे नवीन शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे याच मतदारसंघातील आहेत. भाजपमध्ये माजी महापौर उषा ढोरे, झामा बारणे, नामदेव ढाके, चंद्रकांत नखाते, राजेंद्र गावडे यांची आपापल्या परिसरावर पकड आहे. मात्र, भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी अधूनमधून उफाळून येते. अपक्षांचे गटनेते कैलास बारणे, नवनाथ जगताप याच भागातील असून, ते कोणाकडून उमेदवारी घेणार, हे लवकरच दिसेल. लोकसभा निवडणुकीत श्रीरंग बारणे यांना सर्वाधिक मताधिक्य याच मतदारसंघाने दिले होते.
शरद पवार गटासाठी निवडणूक प्रतिष्ठेची
या मतदारसंघातील राष्ट्र्वादीत पडझड झाली आहे. २०१७ मध्ये भाजपच्या तिकिटावर निवडून आलेले तुषार कामठे आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष आहेत. विधानसभेपासून शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे हेही शरद पवार गटात गेले आहेत. राष्ट्रवादी विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे याच मतदार संघातील आहेत. या नेत्यांसाठी ही प्रतिष्ठेची निवडणूक आहे.
उद्धवसेनेला फटका
उद्धवसेनेची ताकद येथे कमी झाली आहे. या गटाचे माजी शहराध्यक्ष ॲड. सचिन भोसले यांचा प्रभाग शिंदे गटाने फोडला आहे. राहुल कलाटे, नीलेश बारणे, अश्विनी चिंचवडे यांनी उद्धवसेनेची साथ सोडली आहे. खासदार बारणे यांनी येथील शिंदेसेनेची धुरा हाती घेतली आहे.
अजित पवार गटाची ताकद पण...
राष्ट्रवादी अजित पवार गटात माजी महापौर अपर्णा डोके, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, नाना काटे, प्रशांत शितोळे, अतुल शितोळे, मोरेश्वर भोंडवे, राजेंद्र जगताप, मयूर कलाटे आदी नेते आहेत. राष्ट्रवादीचे येथे वर्चस्व आहे, मात्र या नेत्यांनी आपापल्या भागापुरते न पाहता सर्वत्र जोर लावल्यास समीकरणे बदलतील.
मतदारांना हवी स्पष्ट भूमिका
चिंचवड मतदारसंघाचा चेहरा आयटीयन्स आणि सोसायटीधारक मतदारांनी बदलला आहे. हिंजवडी आयटी पार्कमुळे आलेल्या नवमतदारांना वाहतूक, पाणीपुरवठा आणि अतिक्रमणविरोधी कारवाई या मुद्द्यांवर स्पष्ट भूमिका हवी आहे.
मतदारसंघात २०१७ मध्ये कोणाकडे किती सदस्यसंख्या
पक्ष - उमेदवार संख्या
भाजप - ३४ (एक अपक्ष भाजप पुरस्कृत)
राष्ट्रवादी काँग्रेस - १२
शिवसेना - ६
अपक्ष -३
मतदारसंघातील मतदारसंख्या
पुरुष - महिला - इतर - एकूण
३,५४,७६८ - ३,२१,८१२ -५८-६,७६,६३८