स्टार ११३६
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे शहर दुचाकींचे म्हणून ओळखले जाते. येथे हेल्मेटसक्ती विरोधात जोरदार आंदोलने झाली. त्यामुळे राज्यात आता रस्त्यावर थांबवून विनाहेल्मेटची कारवाई केली जात नाही. केवळ सीसीटीव्हीमार्फतच विनाहेल्मेटची कारवाई केली जाते. मात्र, त्यातूनच मग एका बाजुला विनाहेल्मेट दुचाकी वाहनचालकांची संख्या वाढली असून वाहतुकीचे इतर नियमही सर्रास धाब्यावर बसविले जात आहेत. सध्या ट्रीपल सीट जाणाऱ्यांची संख्या वाढताना दिसत आहे.
ट्रीपल सीट वाहने चालविणे कायद्याने गुन्हा असला तरी सर्रास हे केले जाते. विनागिअरच्या दुचाकींची संख्या वाढली आहे. चालवायला सोपी आणि एक हात मोकळा राहात असल्याने या स्कुटरेट प्रकारातील मोपेड चालविणारे सर्रास मोबाईलवर बोलत जाताना रस्त्यावर दिसून येतात. त्याचवेळी ट्रीपल सीट जाणारेही स्वत: वाहतुकीचे नियम मोडत असतात. त्याचबरोबर सिग्नल न पाळणे, उलट्या दिशेने जाणे असे प्रकार करताना दिसत असतात.
वाहतूक पोलिसांकडून अशा वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्याविरोधात कारवाई केली जाते. मात्र, वाहतूक पोलिसांच्या कारवाईलाही मर्यादा आहेत. ते सर्वत्र उपस्थित राहू शकत नाही. अनेकदा अशा वाहनचालकांवर कारवाई करताना वादावादीचे प्रसंग घडत असतात.
६ हजारांहून अधिक वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई
शहरात ट्रीपल सीट जाणाऱ्या गेल्या ६ महिन्यात तब्बल ६ हजारांहून अधिक वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यांच्याकडून १२ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
दुचाकी वाहनचालकांना हे नियम पाळा
दुचाकी चालविताना वाहनचालकांनी किमान काही नियम पाळले जर त्यांची सुरक्षितता निश्चितच वाढेल. दुचाकीवरून जाताना नेहमी हेल्मेटचा वापर करावा.
दुचाकीवरुन सामान नेताना ते वाहनांच्या बाहेरपर्यंत येईल. त्यामुळे गाडी चालविताना तिच्यावर नियंत्रण ठेवणे अवघड होईल, असे जड सामान नेऊ नये.
दुचाकी चालविताना एकेरी मार्गावर विरुद्ध दिशेने जाऊन स्वत:चा व समोरील वाहनचालकाचा जीव धोक्यात घालू नये.
--------------------
.... तर पाचशे रुपये दंड
विनाहेल्मेट दुचाकी वाहन चालवत असाल, तर तुम्हाला पाचशे रुपये दंड होऊ शकतो. तुमच्या नकळत चौकातील सीसीटीव्हीद्वारे तुमच्यावर कारवाई होऊ शकते.
चारचाकी वाहन चालवत असताना सीटबेल्ट आवश्य वापरावा, नाही तर पाचशे रुपये दंड होऊ शकतो.
तसेच दुचाकीवरून अवजड माल वाहून नेत असाल तर तुम्हाला पाचशे रुपये दंड होऊ शकतो.