सोमेश्वरनगर : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या विद्यमान उपाध्यक्षांची मुदत संपल्याने नवीन उपाध्यक्षपदी कोणाला संधी मिळणार? याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे. पाच वर्षांत पाच उपाध्यक्ष होणार असल्याने पाच संचालकांना या पदावर काम करण्याची संधी मिळणार आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार हेच अंतिम निर्णय घेणार असून, ते आपले मत कोणाच्या पारड्यात टाकतात, याकडे सभासद शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे काम प्रामाणिकपणे करणाऱ्याच कार्यकर्त्याला संधी मिळावी, अशी अपेक्षा सर्वसामान्यांना आहे. आगामी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून पक्षाचे काम निष्ठेने करणाऱ्या संचालकालाच संधी मिळण्याची शक्यता आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार हे धक्कातंत्र वापरत पुन्हा एकदा पुरंदर की बारामती तालुक्याला संधी देतात का, याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे. सोमेश्वर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक १२ ऑक्टोबर २०२१ ला पार पडली होती. निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत सोमेश्वर विकास पॅनेल व सोमेश्वर परिवर्तन पॅनेलमध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीने एकहाती विजय मिळवला होता.बारामती, पुरंदर, खंडाळा आणि फलटण या चार तालुक्यांत कार्यक्षेत्र असलेल्या सोमेश्वर कारखान्याचे उपाध्यक्षपद मिळावे यासाठी इच्छुक संचालकांनी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. तरुण, अभ्यासू, सहकारातील जाण असलेल्या तरुण संचालकांना संधी मिळते की ज्येष्ठ संचालकांना संधी मिळणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे. सुरुवातीला आनंदकुमार होळकर आणि त्यांनंतर कारखान्याच्या इतिहासात प्रथमच महिला संचालक प्रणिता खोमणे यांना उपाध्यक्षपदी काम करण्याची संधी मिळाली होती. तिसऱ्या वर्षात पुरंदरचे बाळासाहेब कामथे यांना उपाध्यक्षपदी काम करण्याची संधी मिळाली.त्यांचा कार्यकाल संपल्याने इच्छुक संचालकांनी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. सध्याच्या संचालक मंडळातील संग्राम सोरटे, किसन तांबे, ऋषिकेश गायकवाड, शिवाजीराव राजेनिंबाळकर तर पुरंदरमधून शांताराम कापरे, विश्वास जगताप, जितेंद्र निगडे, अनंत तांबे यांची नावे चर्चेत आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून अजित पवार हे अनपेक्षित धक्कातंत्राचा वापर करण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी कारखान्याची उपाध्यक्ष यांची निवड निवड ४ फेब्रुवारी रोजी झाली होती. पहिल्या निवडीला ११ महिन्याने राजीनामा देण्याचे आदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दिले गेले होते. शुक्रवारी (दि. १४) रोजी संचालक मंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीत रिक्त संचालक पदाची निवडणूक होणार आहे तसेच उपाध्यक्षपदाचा राजीनामा होतो का? याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे.
'सोमेश्वर' उपाध्यक्षपदी कोणाची वर्णी? उपमुख्यमंत्री अजित पवार घेणार निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 14:00 IST