पुणे: सिंहगड रस्त्यावरील (नरवीर तानाजी मालुसरे रस्ता) विठ्ठलवाडी ते फन टाइम थिएटर यादरम्यानचा उड्डाणपूल खुला करण्यास आज अखेर मुहूर्त मिळाला. या एकेरी उड्डाणपुलाचे उद्घाटन महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून १ मे रोजी सकाळी सात वाजता उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले आहे. यामुळे राजाराम पुलाकडून वडगावच्या दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांची महाराष्ट्रदिनी वाहतूककोंडीतून मुक्तता होणार आहे. सकाळी उद्घाटन केलं तर इतरांना कामाचा त्रास होतो, उशिरा उठणाऱ्या लोकांना सुद्धा लवकर उठावं लागतं अशी मिश्किल टिप्पणी अजित पवारांनी केली आहे.
अजित पवार म्हणाले, सिंहगड रोड वरील उड्डाणपुलाचे उद्घाटन झालं. ज्यांनी ज्यांनी या पुलाचा पाठपुरावा केला त्यांचे सुद्धा अभिनंदन. सिंहगड रोड पुलामुळे नागरिकांचा अर्धा तास कमी होईल. शहरात २ रिंग रोड करत आहोत. पुणे, पिंपरी चिंचवड महापालिका, पी एम आर डी ए, राज्य सरकार आम्ही ही कामं पूर्णत्वाला नेण्याचे काम करतोय. आम्ही सगळे जणं मिळून ५ वर्षात शहराच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत. यंदाचा अर्थसंकल्प ७ लाख कोटींचा सादर झाला. महाराष्ट्राला पैसे कमी पडणार नाही, मात्र पुणे आपलं आहे त्याला झुकते माप दिले जाईल. ३५० कोटी प्रकल्प बाणेर येथे असलेला एक प्रकल्प आज वेळ नसल्यामुळे उद्घाटन करता येत नाहीये. मुलांनी पुढील काळात कसे शिक्षण मिळेल यासाठी आम्ही अनेक जिल्ह्यात काम करतोय. कुठली ही अडचण नाही, लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. ६५ वर्षांपूर्वी महाराष्ट्र संयुक्त झाला, आज ६६ वा स्थापना दिनानिमित्त नागरिकांना शुभेछा देतो. कष्टकऱ्यांच्या घामाचा जीवावर राज्य उभे आहे. असे म्हणत त्यांनी यावेळी सर्वांना कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
या उड्डाणपुलाचे काम २१ सप्टेंबर २०२१ मध्ये सुरू करण्यात आले असून ७१ पिलर्स आणि १०६ गर्डर उभारलेले आहेत. विठ्ठलवाडीकडून स्वारगेटकडे येण्यासाठी राजाराम पूल चौकात उभारलेला उड्डाणपूल यापूर्वीच वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. विठ्ठलवाडी ते फनटाइम थिएटर यादरम्यान एकेरी उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले आहे, तर माणिकबाग ते विठ्ठलवाडी यादरम्यानच्या एकेरी पुलाच्या दोन्ही बाजूंच्या रॅम्पचे काम सुरू आहे.