What is the significance for women in the Pune Municipal Budget? | पुणे महापालिकेच्या अंदाजपत्रकात महिलांसाठी नेमकं काय.....
पुणे महापालिकेच्या अंदाजपत्रकात महिलांसाठी नेमकं काय.....

पुणे: महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये अल्प दरात महिलांची कर्करोगाची तपासणी, महिला व युवतींना स्वसंरक्षण, स्वावलंबन आणि समुपदेशनची सुविधा देणे, आयटी शहरात महिलांची राहण्याची अडचण लक्षात घेऊन महिलांसाठी वसतिगृह, महिलांना शारीरिक, सामाजिक, आर्थिक व मानसिक स्वरूपात सशक्त बनविण्याच्या उद्देशाने राणी लक्ष्मीबाई महिला सक्षमीकरण योजना अशा विविध योजना महिलांसाठी महापालिकेच्या सन २०१९-२० च्या अंदाजपत्रकामध्ये प्रस्तावित केल्या आहेत. 
.......................
-महिलांसाठी कर्करोग निदान चाचणी : १ कोटी तरतुद
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत शहरात १९ प्रसूतिगृहे चालविली जातात. महापालिकेच्या सर्व १९ प्रसूतिगृहांमध्ये स्मार्ट स्कोप हे कर्करोगाचे निदान करणारे उपकरण उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महिलांना ही सुविधा अत्यल्प दरात उपलब्ध होणार आहे. 
................
-महिलांसाठी वसतिगृह : २ कोटीची तरतुद 
शिक्षण आणि नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने परगावांहून पुण्यात येणाºया महिला आणि युवतींची संख्या मोठी आहे. कळस-धानोरी परिसरात महापालिकेच्या वतीने विद्यार्थिनी आणि नोकरी करणा-या महिलांसाठी वसतिगृह बांधण्यात येणार आहे. 
...............
-राणी लक्ष्मीबाई महिला सक्षमीकरण योजना : २ कोटी ५० लाख 
महिलांना शारीरिक, सामाजिक, आर्थिक व मानसिक स्वरूपात सशक्त बनविण्याच्या उद्देशाने राणी लक्ष्मीबाई महिला सक्षमीकरण योजना सुरू करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत महिला व युवतींसाठी स्वसंरक्षण, स्वावलंबन आणि समुपदेशन या तीन बाबींवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. महिला व युवतींमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी आणि त्यांना स्वसंरक्षण करता यावे यासाठी ज्यूदो, कराटे, लाठी-काठी, योगासने व व्यायाम शिकविले जाणार आहेत.पौगांडावस्थेतील मुली, युवती, विवाहित महिला यांच्या विविध समस्या व प्रश्न, कौटुंबिक सल्ला, महिलांचे अधिकार, कायदे याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी समुपदेशन केंद्र सुरू करण्यात येणार आहेत.
............. 
-मागासवर्गीय समाजातील महिलांसाठी स्वयंरोजगार : पुरेशी तरतुद
मागासवर्गीय समाजातील महिलांना स्वयंरोजगारासाठी उद्योग-व्यवसाय सुरू करता यावा यासाठी कौशल्य प्रशिक्षण, उद्योग-व्यवसाय प्रशिक्षण, प्रकल्प अहवाल तयार करणे, भांडवल उभे करणे, अल्प दरात कर्ज मिळविणे, विविध प्रकारच्या उद्योग, ववसाकि समस्या सोडविण्यासाठी मार्गदर्शन करणे यासाठी उद्योग व्यवसायाबाबतचे संगोपन (इनक्युबेशन) केंद्र सुरू करण्यात येणार आहे.  
......................
- महिल्यांच्या स्वच्छतागृहांकडे दुर्लक्षच....
स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक यांनी आपल्य सन २०१९-२० च्या अर्थसंकल्पात महिलांच्या काही योजनांना प्राधान्य दिले असले तरी गेल्या अनेक वर्षांपासून अपु-या स्वच्छतागृहाची समस्या दूर करण्यासाठी अंदाजपत्रकामध्ये फारचा विचार केलेला दिसत नाही. शहरामध्ये आजही महिला स्वच्छतागृहांचा प्रश्न अत्यंत गभीर आहे. अपुरी संख्या अत्यंत अस्वच्छ व दयनीय आवस्थेतील स्वच्छतागृहामुळे महिलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. परंतु महिलांच्या स्वच्छतागृहाची संख्या वाढविण्यासाठी अंदाजपत्रकामध्ये फारसे काही करण्यात आले नाही. 


Web Title: What is the significance for women in the Pune Municipal Budget?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.