त्या पत्रकांचे करायचे काय?
By Admin | Updated: January 12, 2017 02:51 IST2017-01-12T02:51:22+5:302017-01-12T02:51:22+5:30
आझम पानसरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला अलविदा करत भाजपमध्ये प्रवेश केल्याने साहजिकच शहराच्या राजकारणातील

त्या पत्रकांचे करायचे काय?
पिंपरी : आझम पानसरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला अलविदा करत भाजपमध्ये प्रवेश केल्याने साहजिकच शहराच्या राजकारणातील गणिते बदलणार हे नक्की झाले आहे. राष्ट्रवादीला याचा किती फटका बसू शकतो यावर आता चहा टपरी, चौकाचौकांत अंदाजाच्या फैरी झडू लागल्या आहेत. मात्र, या सर्वांमध्ये राष्ट्रवादीच्या इच्छुक उमेदवारांची गोची झाली आहे.
उमेदवारी जाहीर होण्याअगोदरच प्रचाराचा शहरभर धुरळा उडत आहे. राष्ट्रवादीच्या इच्छुकांनी यासाठी लागणारी परिचयपत्रके हजारोंच्या संख्येने छापली आहेत. शिवाय महागडे डिजिटल फ्लेक्सही मोठ्या प्रमाणात छापले गेले आहेत. या पत्रके आणि फ्लेक्सवर पक्षाध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांच्यासह आझम पानसरे यांचे छायाचित्र छापले आहे. मात्र पानसरे यांनी राष्ट्रवादीला अलविदा केले. त्यामुळे छापलेल्या पत्रकांवरील फोटोचे काय करायचे, असा सवाल या इच्छुकांना पडला आहे. पत्रकांवर आणि फ्लेक्सवर लाखो रुपये खर्च झालो आहेत. ही पत्रके कचऱ्याच्या टोपलीत टाकण्याची वेळ या इच्छुकांवर आली आहे. यावर काही उमेदवारांनी दोन्ही दगडावर पाय ठेवण्याची मात्रा शोधून काढली आहे. ‘भाई’ दुसऱ्या पक्षात जरी गेले असले, तरी ते आपल्यालाच मदत करणार हे नक्की, असे सांगत साहेब, दादांच्या जोडीला आम्ही भार्इंचा फोटो ठेवणार असल्याचे पानसरे गटाचे इच्छुक सांगत आहेत.(प्रतिनिधी)