किरण शिंदे
पुणे: त्यादिवशी दहशतवादी आमच्या जवळ आले. आम्ही खाली बसलो होतो त्यांनी आम्हाला उठवले. संतोष जगदाळेंना त्यांनी बाजूला नेले. तुम्हाला अजान म्हणता येते का? तुम्ही हिंदू आहात का असा प्रश्न त्यांनी विचारला.. मी त्यांना मारू नका म्हणून विनवणी करत होते. मात्र दहशतवाद्यांनी आमचे काहीही न ऐकता संतोष जगदाळेंना गोळ्या घातल्या. त्यानंतर आमच्याकडे पाहून मोदींना जाऊन सांगा असे म्हटले. आम्हीही नरेंद्र मोदींना सांगितले आणि त्यांनी आता प्रत्युत्तरही दिले. आता ते (पाकिस्तानी) कोणाला जाऊन सांगणार अशा शब्दात पहलगाम हल्ल्यातील पिडीत प्रगती जगदाळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
२२ एप्रिल या दिवशी जेव्हा दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला केला तेव्हा प्रगती जगदाळे या पती संतोष जगदाळे आणि मुलगी आसावरी जगदाळे यांच्यासह त्या ठिकाणी होत्या. दहशतवाद्यांनी प्रगती जगदाळे यांच्या डोळ्यासमोर संतोष जगदाळे यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या होत्या. या भ्याड आल्यानंतर भारताने कारवाई करावी अशी मागणी सातत्याने केली जात होती. आणि त्यानंतर भारतीय सैन्याने मंगळवारी रात्री कारवाई करत पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या तळ नेस्तनाबूत केले. प्रगती जगदाळे यांनी भारताने केलेल्या या कारवाईचे स्वागत करताना समाधान व्यक्त केले.
प्रगती जगदाळे म्हणाल्या, मी नरेंद्र मोदींचे आभार मानते. १५ दिवसांनी का होईना त्यांनी प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली. नरेंद्र मोदी बदला घेणार याचा विश्वास मला होता. दहशतवाद्यांनी गोळ्या झाडताना मोदींना जाऊन सांगा, मोदींना जाऊन सांगा म्हणत एकप्रकारे मेसेज दिला होता. आणि आता नरेंद्र मोदींनीही त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. भारतीय सैन्याने केलेल्या या कारवाईने समाधानाची भावना आहे. मात्र आम्हाला पूर्ण न्याय तेव्हाच मिळेल जेव्हा दहशतवादाची पाळेमुळे संपूर्णपणे नष्ट केली जातील. नरेंद्र मोदी जेव्हा संपूर्णपणे दहशतवाद नष्ट करतील तेव्हाच आम्हाला पूर्ण न्याय मिळेल.
ऑपरेशन सिंदूर, नरेंद्र मोदींची दूरदृष्टी
दहशतवाद्यांनी आमच्या डोळ्यादेखत आमचे कुंकू पुसले. एका महिलेसाठी कुंकवाचे मौल्य काय असते याची जाणीव नरेंद्र मोदींना आहे. नरेंद्र मोदी आम्हाला लेकीसारखे मानतात. आणि त्यांच्या याच लेकीच्या कपाळाचे कुंकू या दहशतवाद्यांनी पुसले होते. या घटनेमुळे नरेंद्र मोदींना वेदना झाल्या होत्या. म्हणून त्यांनी आमच्यासारख्यांना न्याय देण्यासाठी या कारवाईचं नाव ऑपरेशन सिंदूर असे ठेवले. भारताने केलेल्या या कारवाईला ऑपरेशन सिंदूर असे नाव ठेवल्याचे जेव्हा पहिल्यांदा समजले तेव्हा मन भरून आले. आम्हाला न्याय देण्यासाठी ऑपरेशन सिंदूर हे नाव ठेवावे हे त्यांना कसे सुचलं असेल असा विचार मनात आला. या कारवाईला देण्यात आलेले ऑपरेशन सिंदूर हे नाव अतिशय योग्य आहे.