मोठी बातमी! "शिवसेनेत येण्याबाबत विचार करावा," वसंत मोरेंना थेट मुख्यमंत्र्यांची ऑफर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 13:26 IST2022-04-08T13:25:59+5:302022-04-08T13:26:52+5:30
वसंत मोरे यांनी शहराध्यक्ष पद सोडल्यावर त्यांना इतर पक्षांकडून ऑफर येण्यास सुरवात

मोठी बातमी! "शिवसेनेत येण्याबाबत विचार करावा," वसंत मोरेंना थेट मुख्यमंत्र्यांची ऑफर
पुणे : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शनिवारी गुढी पाडव्यानिमित्त आयोजित मेळाव्यात राजकीय घडामोडींबरोबरच धार्मिक विषयांना हात घातल्याने त्यांच्यावर टीका टिपण्णीचे सत्र सुरु झाले आहे. पुण्यात तर मनसैनिकांमध्ये नाराजी असल्याचे दिसू लागले आहे. भाषणानंतर पुण्यातील मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी अडचणीत असल्याचे सांगितले होते.
''मी ज्या भागात १५ वर्षांपासून लोकप्रतिनिधित्व करतोय त्याठिकाणी सर्व मुस्लिम बांधव माझ्या सोबत आहेत. त्यांचे आणि माझे जवळचे संबंध आहेत. त्या भाषणानंतर ती लोक दहशतीखाली गेली आहेत. ज्यांना आम्ही चाचा, मामु, खाला म्हणत मोठं झालोय. ती लोक आमच्याकडे संशयाने बघायला लागली आहेत. त्यामुळे मन व्यथित झाल्याचे ते म्हणाले होते. त्यानंतर वसंत मोरे यांनी शहराध्यक्ष पद सोडले आहे. तर साईनाथ बाबर यांची नवीन शहराध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.
वसंत मोरे यांनी शहराध्यक्ष पद सोडल्यावर त्यांना इतर पक्षांकडून ऑफर येण्यास सुरवात झाली आहे. त्यातच एक मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोरें यांना फोन केला आहे. ''शिवसेनेत येण्याबाबत विचार करावा,'' अशी ऑफर मुख्यमंत्र्यांनी दिली असल्याचे मोरें यांनी सांगितले आहे. एका माध्यमाला मुलाखत देताना ते बोलत होते.
मोरे म्हणाले, माझ्या शहराध्यक्षपदाची मुदत एक वर्षाची होती. जी मार्चमध्ये संपली. त्यामुळे नव्या शहराध्यक्षांची निवड झाली तरी काही बिघडत नाही. आमच्याकडे राज ठाकरे यांचा शब्द अंतीम असतो. वसंत मोरेंच्या निष्ठा अजूनही राज ठाकरे यांच्यासोबत आहेत. ठाण्यातल्या उत्तरसभेला मी जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष यांनी दिली ऑफर
राज ठाकरे गुढीपाडव्याला मांडलेले विचार सामान्य मराठी माणसाला न पटणारे आहेत. मनसेच्या समस्त कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये येण्याच आवाहन मी करत आहे. वसंत मोरे यांचेही पक्षात स्वागत आहे. आपण कुठल्याही जातिधर्मात न अडकता शहर, राज्य, देशाचा विकास करण्यासाठी कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत यावे. त्यांचा योग्य तो मानसन्मान जपला जाईल असे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले.