आम्हाला मदत नको; नृत्यकला शिकवू द्या...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:10 IST2021-04-11T04:10:40+5:302021-04-11T04:10:40+5:30
पुणे : ‘राज्यात साधारणपणे एक लाख नृत्य वर्ग असून, सुमारे दहा ते पंधरा लाखाहून अधिक विद्यार्थी नृत्याचे प्रशिक्षण घेतात. ...

आम्हाला मदत नको; नृत्यकला शिकवू द्या...
पुणे : ‘राज्यात साधारणपणे एक लाख नृत्य वर्ग असून, सुमारे दहा ते पंधरा लाखाहून अधिक विद्यार्थी नृत्याचे प्रशिक्षण घेतात. नृत्य वर्ग हे महाराष्ट्रातील खेड्यापाड्यापर्यंत उपजीविकेचे साधन झालेले असताना या कलाकारांनी अचानक दुसरे काम कसे सुरू करायचे? असा प्रश्न नृत्य कलावंत आणि शिक्षकांनी उपस्थित केला आहे.
‘नृत्यकला ही कौशल्य, मौजमजा, करमणूक, वजन कमी करण्याचा व्यायाम किंवा मुलांच्या गुणदर्शनसाठीचा महत्त्वाचा प्रकार मानला जातो. हजारो तरुण-तरुणी नोकरीच्या मागे न धावता स्वत:च्या अंगभूत कलेच्या जोरावर जगत आहेत आणि कला जिवंत ठेवत आहेत, याचा सरकारला विसर पडला आहे,’ अशी टीका नृत्य कलाकार आणि शिक्षक जतीन पांडे यांनी केली. शालेय स्नेहसंमेलन, स्पर्धा, वाहिन्यांवरील कार्यक्रम, व्यावसायिक कार्यक्रम आणि लग्नसमारंभातील संगीत अशा अनेक माध्यमातून बहरलेला हा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाल्याने कलाकारांचे जगणे अवघड झाले आहे. घरभाडे, किराणा, मुलांचे शिक्षण, कजार्चा हफ्ता हा खर्च कसा करायचा? महाराष्ट्राची लोककला जपण्याची जबाबदारी सरकार व समाजाची आहे की नाही? आम्हाला मदत करण्याऐवजी नृत्य कला शिकवू द्या. चार पैसे मिळाले तर खर्च भागवता येईल. नृत्य कलाकारांच्या आत्महत्यांचे पातक आपल्या माथी लागण्याची वेळ समाजाने आणि सरकारने येऊ देऊ नये. याकडे पांडे यांनी लक्ष वेधले आहे.
----------------------------
लोककला आणि पाश्चिमात्य नृत्य शिकवणा-या कलाकारांचे शिक्षण दहावी-बारावीपर्यंत झालेले आहे. नोकरी मिळवून चांगले जीवनमान राखण्याइतका आर्थिक मोबदला त्यांना मिळवता येत नाही. क्लास बंद झाल्याने कमवायचे काय आणि जागेचे भाडे कसे द्यायचे हा प्रश्न अनेक कलाकारांपुढे निर्माण झाला आहे.
- निकिता मोघे, नृत्य दिग्दर्शक
-------