राजगुरुनगरला होणारा पाणीपुरवठा पिण्यास अयोग्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:16 IST2021-05-05T04:16:57+5:302021-05-05T04:16:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क राजगुरुनगर : संपूर्ण राजगुरुनगरला पाणी पुरवणाऱ्या केदारेश्वर बंधाऱ्यातील पाण्याचे नमुने गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र ...

राजगुरुनगरला होणारा पाणीपुरवठा पिण्यास अयोग्य
लोकमत न्यूज नेटवर्क
राजगुरुनगर : संपूर्ण राजगुरुनगरला पाणी पुरवणाऱ्या केदारेश्वर बंधाऱ्यातील पाण्याचे नमुने गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य सार्वजनिक आरोग्य सेवेच्या आरोग्य प्रयोगशाळेने तपासण्यासाठी घेतले होते. हा अहवाल नगरपरिषदेला प्राप्त झाला असून, हे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा अहवाल या संस्थेने दिला आहे. यामुळे राजगुरुनगरवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पाणी पिण्यास योग्य नसल्याने पैसे मोजून शुद्ध पाणी विकत घेण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.
महाराष्ट्र राज्य सार्वजनिक आरोग्य सेवेच्या आरोग्य प्रयोगशाळेतर्फे ६ एप्रिलला राजगुरुनगर शहरातील विविध अशा वीस विभागांमधून पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले होते. बहुतांश ठिकाणच्या नमुन्यासाठी घेतलेल्या पाण्यातील संभाव्य सूक्ष्मजंतूंची टक्केवारीपैकी कोलिफॉर्म्सचे प्रमाण सर्व भागांमधील नमुन्यात १६ टक्केपेक्षा जास्त असल्याचे आढळले. त्याचप्रमाणे थर्मोटॉलरंट कोलिफॉर्म्सचे प्रमाण अरिहंत रेसिडेन्सी, सुलोचना हाईट्स या दोन ठिकाणी ३ टक्केइतके आहे.. नेहरू चौक, वाडा रोड, समतानगर या तीन ठिकाणी ६ टक्के तर केदारेश्वर पाण्याची टाकी या ठिकाणी ९ टक्के असल्याचे आढळून आले आहे. इतर ठिकाणी ते प्रमाण शून्य टक्के आहे. तसेच ई. कोलायचे प्रमाण वाडा रोड पाण्याची टाकी येथे ६ टक्के, तर केदारेश्वर पाण्याची टाकी या ठिकाणी ९ टक्के असल्याचे आढळून आले आहे. इतर ठिकाणी ते प्रमाण शून्य टक्के आहे. तरी या पिण्यास अयोग्य असणाऱ्या पाण्यावर योग्य प्रमाणात क्लोरीनची प्रक्रिया केल्यानंतर व सूक्ष्मजीवीय पुनर्तपासणीनंतर पिण्यास योग्य असल्याची खात्री झाल्यानंतरच ते पाणी पिण्यासाठी नागरिकांना वापरता येईल, असे या अहवालात नमूद केले आहे.
चौकट
राजगुरुनगर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या केदारेश्वर बंधाऱ्याच्या पाण्यावर शेवाळ व दुर्गंधीयुक्त पाणी झाले आहे. जलपर्णीही वाढू लागल्याने पाणी पिण्यास अयोग्य झाले होऊन शहरातील सांडपाणी भीमा नदीत सोडले जाते. तसेच ओढ्यानाल्यांना सोडलेले पाणी नदीत येऊन मिसळत आहे. त्यामुळे काही वर्षांपासून सिद्धेश्वर बंधाऱ्यातल्या नदीच्या पाण्यात जलपर्णी वाढते. तसेच गेली काही वर्षे शेवाळ्यासारख्या पाणवनस्पतीचा तवंगही येत आहे. मात्र पाणी वाहते राहत असल्याने, केदारेश्वर बंधाऱ्यात या दोन्ही वनस्पती राहत नाही. मात्र सध्या केदारेश्वर बंधाऱ्यात पाण्याखाली 'हायाड्रिला' नावाच्या पाणवनस्पतीचा थर साचला आहे.
फोटो ओळ: भीमा नदीत जलपर्णी वाढून शेवाळ साचले आहे. त्यामुळे नदीचे पाणी पिण्यास अयोग्य ठरत आहे.