पुणे: मेट्रोपर्यावरणस्नेही करण्यासाठी महामेट्रो कंपनीच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. मेट्रोच्या उन्नत मार्गावरील (जमीनीपासून २२ फुट उंचीवरच्या) पावसाचे सर्व पाणी थेट जमिनीत खोलवर पाठवण्यात येणार आहे. त्याशिवाय मेट्रो स्थानके, डेपो इथून सौर उर्जेद्वारे वीजनिर्मिती करण्यात येणार असून त्यातून विजेची किमान २० टक्के बचत अपेक्षित आहे. नव्या बांधकामात अडथळा ठरणाऱ्या वृक्षही तोडून न टाकता त्यांचे पुनर्रोपण करण्यात येत आहे. मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी ही माहिती दिली. मेट्रो पर्यावरण स्नेही करण्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी करत असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, वनाज ते रामवाडी व पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मार्गाचे अंतर ३१ किलोमीटर आहे. कृषी महाविद्यालय ते स्वारगेट हा ५ किलोमीटरचा भूयारी मार्ग वगळता अन्य सर्व मार्ग जमीनीच्या वरचा आहे. त्यासाठी अनेक नवी बांधकामे होत आहेत. पीएमपीएल, एस.टी. महामंडळ तसेच रेल्वे अशा लांब पल्ल्याच्या अन्य प्रवासी सेवांबरोबर मेट्रो जोडली जावी यासाठी मेट्रो स्थानकांच्या जवळ रिक्षा, सायकली, मेट्रो फिडर सेवा अशा अनेक सुविधा सुरू करण्यात येतील. या भव्य प्रकल्पातून पर्यावरणाला बाधा येईल अशी कोणतीही गोष्ट मेट्रोकडून होत नसल्याचे दीक्षित म्हणाले. रेन वॉटर हार्वेस्टिंग, सौलर पॅनेल, व मेट्रो कोच, मेट्रोचे रूळ अत्याधुनिक यंत्राने धुतले गेल्यानंतरच्या पाण्याचा पुनर्वापर अशा अनेक गोष्टी यात करण्यात येत आहेत. मेट्रो मार्गात अडथळा ठरणाºया वृक्षांना त्याजागेरून हलवून शहरातील अनेक जागांवर पुनर्रोपीत करण्यात आले आहे. दोन्ही महापालिकांच्या क्षेत्रात १४ हजार ६४५ झाडे नव्याने लावण्यात आली आहेत.
मेट्रो मार्गावरचे पाणी जाणार थेट जमिनीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2019 19:43 IST
रेन वॉटर हार्वेस्टिंग:सौर उर्जेने विजेची २० टक्के बचत..
मेट्रो मार्गावरचे पाणी जाणार थेट जमिनीत
ठळक मुद्देनव्या बांधकामात अडथळा ठरणाऱ्या वृक्षही तोडून न टाकता त्यांचे पुनर्रोपण