सिमेंटचे रस्तेही करणार जलपुनर्भरण
By Admin | Updated: March 22, 2015 00:42 IST2015-03-22T00:42:47+5:302015-03-22T00:42:47+5:30
मोठ्या रस्त्यांपासून ते गल्लीबोळही सिमेंटचे करण्याची टूम गेल्या काही वर्षांत शहरात आली आहे. त्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरत नसल्याने शहरातील भूगर्भ जलपातळी खालावू लागली आहे.

सिमेंटचे रस्तेही करणार जलपुनर्भरण
पुणे : मोठ्या रस्त्यांपासून ते गल्लीबोळही सिमेंटचे करण्याची टूम गेल्या काही वर्षांत शहरात आली आहे. त्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरत नसल्याने शहरातील भूगर्भ जलपातळी खालावू लागली आहे. मात्र, आता याच सिमेंट रस्त्यांचा वापर करून जलपुनर्भरण (रेन वॉटर हार्वेिस्टंग) करण्यात येणार आहे. प्रायोगिक तत्त्वावरील प्रकल्प कोथरूडमधील प्रभाग क्रमांक २८मध्ये रामकृष्ण परमहंंसनगर येथे राबविण्यात येत आहे.
कोट्यवधी रुपये खर्च करून रस्ता करताना जलसंवर्धनासाठी नाममात्र खर्च येत असल्याने ही यंत्रणा कोणत्याही रस्त्याच्या ठिकाणी करणे महापालिकेला सहज शक्य आहे.
४शहरात रेनवॉटर हार्वेस्टिंगचे प्रमाण वाढावे, या उद्देशाने महापालिकेने २००७नंतरच्या सर्व बांधकामांना ही यंत्रणा सक्तीची केली आहे; मात्र त्याला प्रतिसाद मिळत नाही. शहराचा आकार बशीसारखा आहे. टेकड्यांच्या परिसरातील बहुतांश रस्ते उतारावर आहेत. त्यामुळे अशा रस्त्यांवर हा प्रकल्प राबविल्यास पावसाचे पाणी जमिनीत मुरविणे शक्य होणार आहे. त्यासाठी येणारा खर्चही रस्त्याच्या कामांच्या किमतीच्या तुलनेत नगण्य आहे. पावसाच्या पाण्याचे संवर्धन करण्याचा नवा आदर्श शहरात निर्माण होणार आहे.
४पावसाचे पाणी भूगर्भात १५० फूट खाली पोहोचण्यासाठी सुमारे २५ वर्षांचा कालावधी लागतो. मात्र, हेच पावसाचे पाणी बोअरवेल्सच्या माध्यमातून भूगर्भात सोडल्यास अवघ्या २५ सेकंदांत ते १५० फूट खोल जाते. म्हातोबागड टेकडीच्या पूर्व बाजूला रामकृष्ण परमहंसनगर आहे. रस्ते उतारावर असल्याने मोठ्या प्रमाणात त्यावरून पावसाचे पाणी पूर्व दिशेला वाहते. याच उताराचा फायदा घेऊन हा प्रकल्प राबविण्यात आला आहे.३०० मीटर लांबीचा सिमेंट रस्ता तयार करण्यात आला आहे.तो पश्चिमेकडून पूर्वेकडे उतारावर आहे. हा रस्ता संपतो त्या ठिकाणी पावसाळी एक मीटर लांब आणि १० मीटर रूंद असे सुमारे अडीच फूट खोल आयताकृती चेंबर बनविण्यात आले आहे. पावसाचे पाणी वाहून आल्यानंतर या चेंबरमध्ये ते जमा होईल. याच चेंबरच्या डाव्या बाजूला दोन मीटर अंतरावर तब्बल २५० फूट खोल बोअरवेल घेण्यात आले असून, या चेंबरमधून एका पाईपद्वारे हे बोअरवेल जोडण्यात आले आहे.