पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्योग ,व्यवसाय विविध सरकारी व खासगी कार्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी मजूर कामगार पुण्याबाहेर जात आहेत.तरीही पुणे महानगरपालिकेच्या पाणी वापरात कोणताही बदल झाला नसल्याची माहिती समोर आली आहे.पुणे महानगरपालिका हद्दीत वाढत चाललेल्या लोकसंख्येमुळे पालिकेची पाण्याची गरज वाढत असल्याचे दिसून येत होते. तसेच सुमारे चाळीस टक्के पाणी गळती होत असल्याचेही बोलले जात होते. मात्र,कोरोनामुळे गेल्या काही महिन्यांत पुण्यातून सुमारे दीड लाख विद्यार्थी आपल्या गावी गेले आहेत. तसेच चहाच्या टपऱ्या, लहान-मोठे हॉटेल्स, इतर उद्योग, व्यवसाय , शाळा महाविद्यालय बंद आहेत. त्यामुळे पालिकेला लागणाऱ्या पाण्यात घट होईल, असे जलसंपदा विभागातील काही अधिकाऱ्यांना वाटत होते. परंतु, त्यात कोणतीही घट झालेली नाही; अजूनही पालिकेकडून खडकवासला धरणातून दररोज १४.५० ते १४.६० एमएलडी पर्यंत पाणी उचलले जात आहे.
गेल्या वर्षाच्या तुलनेत खडकवासला धरण प्रकल्प सुमारे ५ टीएमसी पाणी अधिक आहे. त्यामुळे पाऊस काही दिवस उशिरा पुण्यात दाखल झाला तरी पुणेकरांना पाणीपुरवठा करण्यास फारशी अडचण येणार नाही. खडकवासला धरण प्रकल्प शनिवारी (दि.१६) ९.२५ टीएमसी एवढे पाणी होते. मागील वर्षी याच तारखेला प्रकल्पात केवळ ४.४९ टीएमसी एवढे पाणी उपलब्ध होते. दुरुस्तीच्या कामासाठी टेमघर धरण २८ फेब्रुवारी २०२० रोजी पूर्णपणे रिकामे करण्यात आले आहे. तरीही खडकवासला धरण प्रकल्पामध्ये ९.२५ टीएमसी एवढे पाणी शिल्लक आहे.
खडकवासला - १.१२ टीएमसी (६५.८२ टक्के)पानशेत - ४.३८ टीएमसी (४१.१६टक्के)वरसगाव ३.७४ टीएमसी (२९.२०टक्के)टेमघर -००.०० टीएमसी (००.००टक्के)