कापडी गोदामाला लागलेल्या आगीत गोडावून जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2017 13:04 IST2017-10-21T12:52:59+5:302017-10-21T13:04:07+5:30
कापड गोदामाला लागलेल्या आगीत लाखोंचे नुकसान झाल्याची घटना बुधवार पेठेतील चोळखण आळीमध्ये रात्री साडे नऊच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

कापडी गोदामाला लागलेल्या आगीत गोडावून जळून खाक
पुणे : कापड गोदामाला लागलेल्या आगीत लाखोंचे नुकसान झाल्याची घटना बुधवार पेठेतील चोळखण आळीमध्ये रात्री साडे नऊच्या सुमारास घडली.
पासोड्या विठोबा चौकात रहेजा हॅण्डलूम नावाचे कापड दुकान आहे. हे दुकान तळ मजल्यावर असून त्याचे गोडाऊन तिसर्या मजल्यावर आहे. या गोडाऊन मध्ये दिवाळीनिमीत्त कापडाचा स्टॉक ठेवण्यात आला होता. या आगीमध्ये सर्व गोडाऊन जळून खाक झाले असून त्यामधील सर्व माल आगीमध्ये जळून गेला आहे.
दाट लोकवस्ती आणि अरुंद रस्ते यामुळे अग्निशामक दलाला घटनास्थळी पोहोचण्यास अडचण येत होती. अग्निशामक दलाच्या पाच वाहनांच्या मदतीने २ तासांच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. या भागांत मोठ्या प्रमाणावर धूर कोंडला होता. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. मात्र फटाक्याच्या ठिणगीमुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान या दुर्घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाही.