वारीच्या वाटेवर वारक-याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2022 18:23 IST2022-06-22T18:23:35+5:302022-06-22T18:23:54+5:30
वारकरी प्रगतशील शेतकरी म्हणून परिचीत होते

वारीच्या वाटेवर वारक-याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
खोर : देऊळगाव गाडा ( ता.दौंड ) येथील वारकरी भूजंग राघू बारवकर ( वय ५८ ) यांचे पालखी मार्गावर आकुर्डी येथे ह्रदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. बारवकर हे गेली १५ वर्ष संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्या बरोबर पंढरीच्या वारीला जात होते. त्यांची पत्नी लिलाबाई यापण त्यांच्या बरोबर असत. काही वर्ष पूर्वी त्यांनी स्वतःच्या नातीला पंढरीची वारीबरोबर घेऊन गेले होते.
यंदाही ते प्रस्थानापासून वारीत पत्नी सोबत होते. आज पहाटे बारवकर यांना घाम आल्याने त्यांनी शर्ट काढला. मात्र त्यानंतर छातीत तीव्र कळा येऊ लागल्या. काही वेळातच त्यांना ह्रदय विकाराचा तीव्र झटका आला. रूग्णलायात दाखल करण्या अगोदरच त्यांचा मृत्यू झाला. आज सकाळी देऊळगाव गाडा मधील विठ्ठलवाडीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. माजी आमदार योगेश टिळेकर अंत्यविधीला उपस्थित होते.
बारवकर हे पंचक्रोशीत एकतारी भजनात पारंगत होते. प्रगतशील शेतकरी म्हणून ते परिचीत होते. ते जातीवंत बैलांचे शौकीन व माहितगार होते. त्यांचे मागे पत्नी, दोन मुलगे सुना नातवंडे असा परिवार आहे. माजी आमदार योगेश टिळेकर यांचे सहायक दत्ता बारवकर यांचे ते वडील होत.