पुणे - बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग म्हणून ओळखले जाणारे श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर आगामी महाशिवरात्रीच्या काळातही भाविकांसाठी बंद राहणार असल्याची महत्त्वाची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे. मंदिर परिसरात सुरू असलेल्या विकासकामांमुळे आणि भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.प्रशासनाने मंदिर ९ जानेवारी २०२६ पासून तीन महिन्यांसाठी तात्पुरते बंद केले आहे. सुरुवातीला महाशिवरात्रीदरम्यान (१२ ते १८ फेब्रुवारी) दर्शनासाठी मंदिर खुले करण्याचा विचार होता; मात्र सुरू असलेल्या बांधकामांची सद्यस्थिती पाहता मंदिर उघडणे शक्य नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे यंदाची महाशिवरात्र भक्तांविना साजरी होणार आहे.विकास आराखड्याला गतीश्री भीमाशंकर मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी २८८.१७ कोटी रुपयांचा विस्तृत आराखडा मंजूर करण्यात आला आहे. आगामी २०२७ मधील नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर लाखो भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन पायाभूत सुविधा उभारण्यावर भर दिला जात आहे. यात सभामंडप, सुरक्षित प्रवेश-निर्गमन व्यवस्था, गर्दी नियंत्रण यंत्रणा तसेच वाहनतळ, बसस्थानक, पोलीस ठाणे आणि दवाखान्याची उभारणी यांचा समावेश आहे.सध्या मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर दगडी साहित्य आणि बांधकाम सुरू असल्याने भाविकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नियोजनबद्ध पद्धतीने आणि निश्चित कालमर्यादेत कामे पूर्ण करण्यासाठी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय कायम ठेवण्यात आला आहे.“भीमाशंकर मंदिराचा विकास हा दीर्घकालीन सुरक्षितता, सुविधा आणि भक्तांच्या सोयीसाठी अत्यावश्यक आहे. महाशिवरात्रीलाही मंदिर बंद राहील. विकासकामांना गती देण्यासाठी भाविकांनी प्रशासनाला सहकार्य करावे,” असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले.प्रशासनाच्या या निर्णयामुळे अनेक शिवभक्तांची निराशा होण्याची शक्यता असली तरी भविष्यात अधिक सुरक्षित आणि सुविधायुक्त दर्शनव्यवस्था उपलब्ध करण्यासाठी ही पावले महत्त्वाची मानली जात आहेत.
Web Summary : Bhimashankar temple, a Jyotirlinga, will remain closed during Mahashivratri due to ongoing development work. The administration prioritizes devotee safety and infrastructure upgrades under a ₹288.17 crore plan, aiming for better facilities before the 2027 Nashik-Trimbakeshwar Kumbh Mela. The Collector urges cooperation.
Web Summary : ज्योतिर्लिंग भीमाशंकर मंदिर विकास कार्यों के चलते महाशिवरात्रि पर बंद रहेगा। प्रशासन 288.17 करोड़ रुपये की योजना के तहत भक्त सुरक्षा और बुनियादी ढांचे को प्राथमिकता दे रहा है, जिसका लक्ष्य 2027 नासिक-त्र्यंबकेश्वर कुंभ मेले से पहले बेहतर सुविधाएं प्रदान करना है। कलेक्टर ने सहयोग का आग्रह किया।