Pune Local Body Election: बारामती, फुरसुंगीत आज मतदान, ३ नगर परिषदांमधील १० प्रभागांचाही समावेश, उद्या मतमोजणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 11:19 IST2025-12-20T11:18:07+5:302025-12-20T11:19:08+5:30
या निवडणुकीत अध्यक्षपदाकरिता बारामतीमध्ये १४ उमेदवार तसेच फुरसुंगी-उरुळी देवाची नगरपरिषद येथे ७ उमेदवार आहेत

Pune Local Body Election: बारामती, फुरसुंगीत आज मतदान, ३ नगर परिषदांमधील १० प्रभागांचाही समावेश, उद्या मतमोजणी
पुणे : जिल्ह्यातील २ नगरपरिषदांची संपूर्ण निवडणूक व ३ नगरपरिषदांच्या काही प्रभागांची निवडणूक आज सुरु झाली आहे. त्यासाठी एकूण २३१ मतदान केंद्रे आहेत. यामध्ये एकूण २ लाख १२ हजार ३९६ मतदार असून पुरुष १ लाख ८ हजार ३१०, तर महिला १ लाख ४ हजार ५६ व इतर ३० मतदारांचा समावेश आहे. या सर्व मतदान केंद्रांवर एकूण १ हजार ४२५ अधिकारी व कर्मचारी मतदान केंद्रांवर कार्यरत असणार आहेत. कायदा व सुव्यवस्था राखण्याकरिता पुरेसा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मतमोजणी रविवारी (दि. २१) सकाळी १० वाजल्यापासून सुरू होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.
राज्य निवडणूक आयोगाच्या २९ नोव्हेंबरच्या आदेशानुसार नगरपरिषद, नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी शनिवारी मतदान होणार आहे. यामध्ये बारामती आणि फुरसुंगी-उरुळी देवाची नगरपरिषदांकरिता पूर्ण निवडणूक, तर लोणावळा, तळेगाव दाभाडे व दौंड या नगरपरिषदेच्या काही प्रभागांचा समावेश आहे. या निवडणुकीत अध्यक्षपदाकरिता बारामतीमध्ये १४ उमेदवार तसेच फुरसुंगी-उरुळी देवाची नगरपरिषद येथे ७ उमेदवार आहेत. तसेच बारामती येथील सदस्यांच्या ४१ जागांकरिता १५५ उमेदवार, फुरसुंगी-उरुळी देवाची येथील ३२ जागांसाठी १२० उमेदवार, दौंड येथील एका जागेसाठी (प्रभाग क्र. ९ अ) ३ उमेदवार, लोणावळा येथील २ जागांसाठी (प्रभाग क्र. ५ ब व १० अ) ५ उमेदवार आणि तळेगाव दाभाडे येथील ५ जागांसाठी (२ अ, ८ अ, ८ ब, ७ ब व १० ब) १२ उमेदवार आहेत.
शासकीय कार्यालयांना सुटी
मतदानाची वेळ सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० असून मतदानापूर्वी मॉकपोल घेतला जाणार आहे. मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षेत्रात शनिवारी (दि. २०) सार्वजनिक सुटी जाहीर केली आहे. ही सुटी मतदारसंघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामासाठी त्या मतदारसंघाच्या बाहेर असतील त्यांनासुद्धा लागू राहील. केंद्र सरकारची शासकीय, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक बँका आदींना ही सुटी लागू राहील.