विजेशी खेळ ठरतोय जीवघेणा; ६२ जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 03:33 IST2019-03-10T03:31:16+5:302019-03-10T03:33:02+5:30
विद्युत उपकरणांकडे केलेल्या दुर्लक्षामुळे होताहेत अपघात

विजेशी खेळ ठरतोय जीवघेणा; ६२ जणांचा मृत्यू
- विशाल शिर्के
पुणे : अनधिकृतपणे वायरिंगचे घेतलेले कनेक्शन... उच्च विद्युत तारांजवळ केलेली बेकायदेशीर बांधकामे... वीजपुरवठा करणाऱ्या उपकरणाच्या जवळ वाळत घातलेले कपडे... घरातील सदोष वायरिंग व खराब इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा केला जाणारा वापर यामुळे नागरिकांना आपला जीव गमवावा लागतो. गेल्या ८ वर्षांत शहरातील ६२ नागरिकांना प्राणांना मुकावे लागले आहे.
घरातील वायरिंग अथवा विद्युत संचाची मांडणीची कामे मान्यताप्राप्त विद्युत ठेकेदारांकडूनच करून घेतली पाहिजे. ते कायद्याने बंधनकारकदेखील आहे. मात्र, अनेकदा याचा विचार नागरिक करीत नाहीत. शहरामधून विविध ठिकाणी उच्च विद्युत वाहिनीच्या तारा गेलेल्या आहेत. या तारांपासून पुरेसे अंतर न ठेवताच बांधकामे झालेली आहेत. यामुळेदेखील अपघात होऊन मृत्यू ओढावतो. घराच्या छतावर लोखंडी रॉडशी खेळत असताना एक युवक घराच्या अगदी जवळून गेलेल्या उच्चदाब वाहिनीच्या प्रभाव क्षेत्रात आला. त्यामुळे त्याला प्राणाला मुकावे लागले. पुणे स्टेशन येथे २०१३मध्ये ही घटना घडली होती. बिबवेवाडी येथे इमारतीवर साडी वाळत घालत असताना विद्युतवाहिनीला स्पर्श झाल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. माहिती अधिकार कार्यकर्ते वाजिद खान यांनी ही माहिती समोर आणली आहे.
ओल्या बांबूने झाडावरील नारळ पाडत असताना झालेल्या अपघातात २०१४मध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला. मिक्सरच्या तुटलेल्या वायरला स्पर्श झाल्याने विमाननगर येथील एका व्यक्तीला प्राणांना मुकावे लागले आहे. लग्नाची सजावट करताना चुकीच्या पद्धतीने घेतलेल्या वायरच्या संपर्कात आल्याने मृत्यू झाल्याची घटना गेल्या वर्षी घडली. डंपर मागे घेताना उच्च दाबाच्या वायरला स्पर्श होऊन, तसेच खोदाई करताना पुरेशी दक्षता न घेतल्यानेदेखील कामगारांचा मृत्यू झाला आहे. काही प्रकरणात कचरावेचक आणि उच्च विद्युत दाब केंद्रातील तांब्याची वायर चोरण्याच्या प्रयत्नातही प्रत्येकी दोघांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यातील बहुतांश घटना या विद्युत उपकरणांची पुरेशी काळजी न घेणे, उच्च दाब विद्युत तारांजवळ झालेली बांधकामे, रस्तेखोदाई करताना पुरेशी दक्षता न घेणे यामुळे झाल्याचे दिसून येते. बंड गार्डन, रास्ता पेठ, मुंढवा, हडपसर, पद्मावती व धनकवडी परिसरातील प्राणांतिक अपघाताची आकडेवारी हाती आले आहे. उर्वरित भागातील प्राणांतिक आकडे धरल्यास शहरातील मृतांच्या संख्येत आणखी वाढ होईल.
कुलर वापरताय... : पाणी भरताना स्विच करा बंद
उन्हाळ्यामध्ये कुलरचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढतो. कुलरमधे पाणी भरताना स्विच बंद करून आणि त्याची प्लगपिन काढून ठेवल्यानंतरच कुलरमध्ये पाणी भरले पाहिजे. त्यानंतर स्विच चालू करावा. कुलरचे अर्थिंग चांगले असल्यास लिकेज करंट येत नाही, असे महावितरणकडून सांगण्यात आले.
अशी घ्यावी काळजी
वायरिंगसाठी वापरण्यात येणारी वायर, केबल, केसिंग, पी.व्ही.सी. पाईप, स्विच, सर्किट ब्रेकर आदी साहित्य हे दर्जदार व आय.एस.आय. प्रमाणित असावे.
मल्टी पिन टॅप वापरून अनेक उपकरणे एकाच सॉकेटमध्ये जोडू नका.
घरात ओल्या हाताने स्विच चालू किंवा बंद करू नका, बाथरूममधील वॉटर हीटर, गीझर चालू-बंद करताना विशेष काळजी घ्यावी.
मिक्सर, हीटर, गीझर, वातानुकूलन यंत्र, फ्रिज या उपकरणांसाठी थ्री पिन सॉकेट वापरावे. अशा सॉकेटमध्ये अर्थिंगची व्यवस्था असते.
घरात शॉर्ट सर्किट झाल्यास मेन स्विच तत्काळ बंद करावा.
घरावरील दूरचित्रवाणीची डिश किंवा अॅण्टेना वीजतारांपासून दूर ठेवा.
ओल्या कपड्यांलर विजेची इस्त्री फिरवू नये.