'व्हिटॅमिन डी' च्या डोससाठी पुण्यातील सिंहगडावर दूरदर्शन कर्मचाऱ्याची नग्न आंघोळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2018 13:21 IST2018-02-26T13:19:46+5:302018-02-26T13:21:47+5:30
पुण्यातील सिंहगड किल्ल्यावर नग्न आंघोळ करणाऱ्या दूरदर्शनच्या कर्मचाऱ्याविरोधात पुणे पोलिसांनी गुन्हा नोंदवून अटक केली आहे.

'व्हिटॅमिन डी' च्या डोससाठी पुण्यातील सिंहगडावर दूरदर्शन कर्मचाऱ्याची नग्न आंघोळ
पुणे - पुण्यातील सिंहगड किल्ल्यावर नग्न आंघोळ करणाऱ्या दूरदर्शनच्या कर्मचाऱ्याविरोधात पुणे पोलिसांनी गुन्हा नोंदवून अटक केली आहे. धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉक्टरांनी आपल्याला नेकेड सनबाथ घेण्याचा सल्ला दिला होता, असे या कर्मचाऱ्याने पोलिसांना सांगितले. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार गडावर येणारे ट्रेकर्स आणि स्वच्छता करणारे कर्मचारी यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी ही कारवाई केली.
गडावर येणाऱ्या पर्यटकांनी सांगूनही या दूरदर्शनच्या कर्मचाऱ्याने अंगावर कपडे घालण्यास नकार दिला. आरोपी वानोवाडी येथे राहायला असून धार्मिक भावना दुखावल्याच्या कलम 295 अ आणि कलम 509 अंतर्गत हवेली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. डॉक्टरांनी व्हिटॅमिन डी चा डोसा घ्यायला सांगितला होता. त्यासाठी आपण नग्न आंघोळ करत होतो असे आरोपीने सांगितले.
गडावर आलेल्या लोकांनी त्या व्यक्तिला हटकल्यानंतर तो आडोशाला जाऊन लपला असे पीटीआयच्या वृत्तात म्हटले आहे. काहींनी या घटनेचा व्हिडिओ शूट केला. जो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आरोपीला आज कोर्टात हजर केले जाणार आहे.