Video: राघु-मैनेचा व्हॅलेंटाईन, आजुबाजुला बसलेली कबुतरे पहावेनात; पोपटाची दादागिरी पहा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 11:23 IST2025-02-07T11:22:26+5:302025-02-07T11:23:06+5:30
Viral Video: काही वर्षापासून तापमान वाढत आहे. अशावेळी आजुबाजुच्या झाडांची सावली आपल्याला तसेच प्राणीमात्रांना थंडावा देते. पुण्यात ही हिरवळ कमालीची जपली गेलेली आहे.

Video: राघु-मैनेचा व्हॅलेंटाईन, आजुबाजुला बसलेली कबुतरे पहावेनात; पोपटाची दादागिरी पहा...
- हेमंत बावकर
व्हॅलेंटाईन वीकच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील राघु-मैनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. एका वायरवर बसून हे जोडपे प्रेमलाप करत होते. तेव्हा आजुबाजुला त्यांना कबुतरांचे बसणे मान्य झाले नाही. त्यांच्यापैकी एकाने मग कबुतरांनाच तिथून उठविण्यास सुरुवात केली. या पोपटाची दादागिरी व्हायरल होत आहे.
काही वर्षापासून तापमान वाढत आहे. अशावेळी आजुबाजुच्या झाडांची सावली आपल्याला तसेच प्राणीमात्रांना थंडावा देते. पुण्यात ही हिरवळ कमालीची जपली गेलेली आहे. आताचा विकसित होत असलेला बाहेरचा व पेठांचा भाग वगळला तर पुण्यात बऱ्यापैकी भागात मोठमोठाली झाडे आहेत. यामुळे तिथे नानातऱ्हेचे पक्षी वास करतात. अगदी गावाकडे असतात तसे पक्षी पुणे विद्यापीठ परिसरात मुक्त संचार करत असतात.
हा व्हिडीओ याच भागातील आहे. पक्षी निरिक्षण करत असताना दोन इमारतींवरून गेलेल्या वायरवर हे राघु-मैनेचे जोडपे बसलेले होते. तेव्हा त्यांचा प्रेमलाप सुरु होता. परंतू, आजुबाजुला कबुतरे आल्याने त्यात व्यत्यय आला. यामुळे त्यांच्यातील एकाने कबुतरांवरच या वायरवर बसू नका म्हणून हाकलण्यास सुरुवात केली. पोपटांच्या जोडीचा फोटो काढण्यासाठी खिशात असलेला मोबाईल काढला होता, नंतर या पोपटाची ही दादागिरी पाहून आपसूकच व्हिडीओकडे वळला आणि हा दादागिरीचा क्षण रेकॉर्ड झाला.
राघु मैनेचा व्हॅलेंटाईन, आजुबाजुला बसलेली कबुतरे पहावेनात #pune#ValentinesDay#raghu#raghumaina#Trending#trendingvideo#Maharashtrapic.twitter.com/twvkAwFMZy
— Hemant Bavkar (@hem_rb) February 7, 2025
या भागात राहणाऱ्या रहिवाशांनी आपापल्या सोसायट्यांच्या कुंपणावर अनेक प्रकारचे वृक्ष लावले आहेत. हे वृक्ष लावणाऱ्या मुलांची आता लग्न देखील झाली आहेत. एवढी ही निसर्गसंपदा या लोकांनी जपली आहे. बाजुलाच पुणे विद्यापीठ असल्याने तिथेही या पक्षांचा संचार असतो. या लोकांची पहाट कोकिळेच्या आवाजाने होते, पोपटांचा आवाज, खारुताई आदी गोष्टी इथे रोज पहायला मिळतात अगदी गावासारख्या. निवांतपणा, शांतता आणि थंडावा या भागात तर कायमचाच असतो. शहराच्या कुशीत एवढे निवांत भाग हे एरंडवणे, बोपोडी, औंध आदी भागात आहेत.