विधानसभेचा दाखला शिवसेनेला अडचणीचा
By Admin | Updated: January 24, 2017 13:56 IST2017-01-24T13:56:07+5:302017-01-24T13:56:07+5:30
भाजपाबरोबर युती : तब्बल चार लाख मतांचा दोन्ही पक्षांत फरक, काँग्रेस, राष्टÑवादीला मारावी लागणार मोठी मजल

विधानसभेचा दाखला शिवसेनेला अडचणीचा
विधानसभेचा दाखला शिवसेनेला अडचणीचा भाजपाबरोबर युती : तब्बल चार लाख मतांचा दोन्ही पक्षांत फरक, काँग्रेस, राष्ट्रवादीला मारावी लागणार मोठी मजल पुणे : विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेमुळे पुणे शहरातील सर्वच्या सर्व आठही जागांवर भारतीय जनता पक्षाला घवघवीत यश मिळाले़ केवळ जागांच्या संख्येवरच नाही तर मिळालेल्या मतांमुळेही निर्णायक ठरले आहे़ भाजपाला तब्बल ६ लाख ४२ हजार ३३८ मते मिळाली तर, शिवसेनेला २ लाख ४१ हजार ६२८ मते मिळाली़ या दोन्ही पक्षांमध्ये तब्बल चार लाख मतांचा फरक असून, शिवसेनेबरोबरच्या वाटाघाटीत भारतीय जनता पक्षाकडून हाच मुद्दा मांडण्यात येत आहे. पुण्यातील कोथरूड, खडकवासला, पर्वतीमध्ये विरोधांपेक्षा विजयी मतांची संख्या जास्त होती़ त्याच्यापाठोपाठ शिवसेनेला पुणेकरांनी पसंती दिली असली तरी त्यात मतांमध्ये मोठे अंतर आहे़ शिवसेनेला कमी जागा देता याव्यात, यासाठी युती करताना या मतांचा विचार केला जावा, असा भाजपाचा प्रस्ताव आहे़ त्याचा विचार झाल्यास शिवसेनेला कॅन्टोन्मेंट, कसबा मतदारसंघातील काही जागा सोडून द्याव्या लागतील़ हे शिवसेनला मान्य होईल का, त्यावरच पुढील वाटाघाटी महत्त्वाच्या ठरणार आहेत़ विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे एक आमदार होते. महापालिकेत सत्ता असताना त्यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली़ वडगाव शेरीमध्ये त्यांचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर गेला होता़ शिवसेनेपेक्षा त्यांना १८ हजार मते कमी आहेत़ त्यामुळे महापालिका निवडणुकीत पुन्हा सत्ता प्राप्त करायची असेल तर, त्यांना आघाडीशिवाय पर्याय नाही़ त्यातूनच त्यांनी काँग्रेसपुढे आघाडीचा प्रस्ताव ठेवला आहे़ आघाडी व्हावी, यासाठी ते काँग्रेसपेक्षा जास्त प्रयत्नशील आहेत़ विधानसभेत दोन आमदार असतानाही मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला चौथ्या क्रमांकाच्या मतांवर समाधान मानावे लागले होते़ शिवाजीनगर मतदारसंघात विनायक निम्हण आणिकॅन्टोन्मेंटचा अपवाद वगळता काँग्रेसचे उमेदवार तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर गेले होते़ आता विनायक निम्हणही स्वघरी गेले आहेत़ हे पाहता काँग्रेसला गतवैभव प्राप्त करण्यासाठी मोठी मेहनत करावी लागेल़ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गेल्या महापालिका निवडणुकीत २९ जागा मिळवून सर्वांना धक्का दिला होता़ पण, विधानसभा निवडणुकीपर्यंत त्यांची हवा ओसरली होती़ आता तर अनेक नगरसेवकांनी पक्षांतराचा रस्ता धरला आहे़ असे असले तरी विधानसभा निवडणुकीत मनसेने काँग्रेसच्या बरोबरीनेच १ लाख ६२ हजार ९८१ मते मिळविली होती, याकडे दुर्लक्ष करता येणार नाही़ त्यामुळे गेले ते गेले असे समजून नव्या उमेदीने त्यांना महापालिका निवडणुकीला सामोरे जावे लागेल़