पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसने पेट्रोल, डिझेल दरवाढ आणि घरगुती गॅसच्या दरांत झालेल्या वाढीविरोधात आंदोलन केले. राज्यातील विविध भागात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आंदोलन करत केंद्र सरकारचा निषेध नोंदवला. मात्र, पुण्यातील राष्ट्रवादीच्या आंदोलनात मुरळी नाचवल्याने हे आंदोलन चर्चेचा आणि टीकेचा विषय ठरले आहे. राष्ट्रवादीने महागाईविरुद्ध हे आंदोलन केले आहे.
पुण्यातील स्वारगेट चौकातील आंदोलनात जागरण गोंधळ घालण्यात आला होता. या जागरणात मुरळी नाचवल्याने आंदोलनाच्या गोंधळावर टीका होत आहे. महिलांना अशाप्रकारे आंदोलनात नाचवणे कितपण योग्य, असा प्रश्न विचारला जात आहे. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन या गोंधळाचा व्हिडिओ शेअर केला आहे.