विड्याच्या पानांनी हृदयाच्या कार्यक्षमतेत लक्षणीय वाढ; पुण्यातील संशोधनात समोर आली बाब
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 11:33 IST2025-12-18T11:32:35+5:302025-12-18T11:33:35+5:30
विड्याचे पान सेवन करणाऱ्या रुग्णांमध्ये धाप लागणे, थकवा, अशक्तपणा व छातीत दुखणे या लक्षणांमध्येही लक्षणीय सुधारणा दिसून आली

विड्याच्या पानांनी हृदयाच्या कार्यक्षमतेत लक्षणीय वाढ; पुण्यातील संशोधनात समोर आली बाब
दुर्गेश मोरे
पुणे : हृदयविकारातील गंभीर प्रकार मानल्या जाणाऱ्या हार्ट फेल्युअर (हृदयाची कार्यक्षमता कमी होणे) या आजारावर पारंपरिक भारतीय वनस्पती असलेल्या विड्याच्या पानांचा (नागवेलीचे पान) पूरक उपचार म्हणून सकारात्मक परिणाम होऊ शकतो, असे महत्त्वपूर्ण निष्कर्ष पुण्यात करण्यात आलेल्या एका संशोधनातून समोर आले आहेत. हे संशोधन आहारतज्ज्ञ डॉ. स्वाती खारतोडे यांनी पुणे येथे डिसेंबर २०२३ ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत केले.
हार्ट फेल्युअरमध्ये हृदयाची रक्त पंप करण्याची क्षमता कमी होते. ही क्षमता ‘इजेक्शन फ्रॅक्शन’ या तपासणीद्वारे (इको-कार्डियोग्राफी) मोजली जाते. या अभ्यासात २४२ हार्ट फेल्युअर रुग्णांचा समावेश करण्यात आला होता. यापैकी सुमारे ५० टक्के रुग्णांची ॲन्जिओप्लास्टी झालेली होती आणि सर्व रुग्ण तज्ज्ञांच्या देखरेखीखाली नियमित औषधोपचार घेत होते. रुग्णांना दोन गटांत विभागण्यात आले.
एका गटाला केवळ औषधोपचार देण्यात आले, तर दुसऱ्या गटाला औषधोपचारांसोबत ताजी विड्याची पाने, ओला नारळाचा गर व थोडी वेलची किंवा वाळवलेल्या विड्याच्या पानांची कॅप्सूल असा पूरक आहार १२ आठवड्यांसाठी देण्यात आला. (पानांसोबत चुना, कात, सुपारी, गुलकंद यांचा समावेश नव्हता.)
अभ्यासअंती असे आढळून आले की विड्याचे पान सेवन करणाऱ्या गटामध्ये हृदयाची कार्यक्षमता दर्शविणाऱ्या इजेक्शन फ्रॅक्शनमध्ये लक्षणीय वाढ झाली. अभ्यासाच्या अखेरीस या गटातील ९० टक्के रुग्णांमध्ये इजेक्शन फ्रॅक्शन ५० टक्क्यांपेक्षा अधिक म्हणजेच सामान्य मर्यादेत आले. तुलनेत केवळ औषधोपचार घेतलेल्या गटामध्ये हे प्रमाण फक्त २६ टक्के होते.
विशेष म्हणजे, ॲन्जिओप्लास्टी झालेल्या तसेच न झालेल्या दोन्ही प्रकारच्या रुग्णांमध्ये विड्याचे पान, ओला नारळ व वेलची यांचा पूरक आहार लाभदायक ठरल्याचे सांख्यिकीय विश्लेषणातून स्पष्ट झाले आहे. याशिवाय, विड्याचे पान सेवन करणाऱ्या रुग्णांमध्ये धाप लागणे, थकवा, अशक्तपणा व छातीत दुखणे या लक्षणांमध्येही लक्षणीय सुधारणा दिसून आली.
आयुर्वेदातील ‘तांबूल’ला आधुनिक संशोधनाचा आधार
विड्याच्या पानांमध्ये बाष्पशील तेलांसह अमिनो ॲसिड, कार्बोहायड्रेट, विविध जीवनसत्त्वे तसेच अँटिऑक्सिडंट व दाहशामक घटक आढळतात. भारतीय परंपरेत आणि आयुर्वेदामध्ये ‘ तांबूल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या वनस्पतीला औषधी महत्त्व आहे. नारळ व वेलची यांचा समावेश पोषणमूल्य वाढवण्यासाठी करण्यात आला. या संशोधनाच्या महत्त्वाची दखल घेत आयुष मंत्रालय, दुबई यांनी डॉ. स्वाती खारतोडे यांना हा अभ्यास आंतरराष्ट्रीय सार्वजनिक मंचावर सादर करण्यासाठी आमंत्रित केले आहे.
हा उपाय औषधांचा पर्याय नसून, औषधोपचारांना पूरक म्हणून वापरण्यात आला आहे. भविष्यात मोठ्या प्रमाणावर आणि दीर्घकालीन संशोधनाची गरज आहे.’ या अभ्यासासाठी आयुर्वेदातील ग्रंथसंपदेबाबत माहिती देण्यासाठी आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. सचिन गांधी, तर सांख्यिकीय विश्लेषणासाठी अदिती देशपांडे यांनी सहकार्य केले. -डॉ. स्वाती खारतोडे