वीसगाव-चाळीसगाव दोन दिवसांपासून अंधारात
By Admin | Updated: January 23, 2017 02:29 IST2017-01-23T02:29:30+5:302017-01-23T02:29:30+5:30
भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील वीसगाव-चाळीसगाव खोऱ्यात महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे तीन-चार दिवसांपासून अंधारात

वीसगाव-चाळीसगाव दोन दिवसांपासून अंधारात
नेरे : भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील वीसगाव-चाळीसगाव खोऱ्यात महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे तीन-चार दिवसांपासून अंधारात राहावे लागले आहे़
महावितरण कंपनीच्या अधिकारी, कर्मचारी यांच्या कामाच्या विसंगती, टोलवाटोलवीमुळे वीसगाव-चाळीसगाव खोऱ्यातील जनतेला अंधारात राहावे लागत असून नाहक त्रास सहन करावा लागत आहे़ या भागात कामचुकार कर्मचाऱ्यांमुळे विजेचे वेळेवर दुरुस्तीचे काम केले जात नाही़ भोर येथील महावितरणच्या आॅफिसमध्ये अधिकाऱ्यांना माहिती किंवा तक्रार देण्यासाठी ग्रामस्थ, शेतकरी गेल्यास चार-चार दिवस अधिकारी भेटत नाहीत़ संबंधित विभागाचे अधिकारी पुणे तर कर्मचारी भोर येथे निवासी असल्याने भागात वीज गेली तर दुसऱ्या दिवशीपर्यंत वीज येण्याची वाट पाहावी लागते़ वीसगाव-चाळीसगाव खोऱ्यात ग्रामदैवतांच्या यात्रा चालू आहेत, मात्र वीज नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे़
या भागात पाणी असतानाही वीज नसल्यामुळे महिलांना अर्धा किलोमीटरवरून पाणी आणावे लागत आहे़ महावितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या भोंगळ कारभारामुळे जनतेला वेठीस धरण्यात येत आहे़ (वार्ताहर)