बाप्पाच्या आगमनासाठी वरूणराजाची आजच सलामी; पुण्यात ठिकठिकाणी हलक्या सरींची बरसात
By श्रीकिशन काळे | Updated: September 18, 2023 13:39 IST2023-09-18T13:38:45+5:302023-09-18T13:39:26+5:30
शहरात दुपारी दीड वाजता आकाशात ढग जमा झाले आणि हलक्या सरी कोसळू लागल्या आहेत...

बाप्पाच्या आगमनासाठी वरूणराजाची आजच सलामी; पुण्यात ठिकठिकाणी हलक्या सरींची बरसात
पुणे : गेल्या आठवडाभर उकाडा सहन केल्यानंतर रविवारी आणि आज (दि.१८) पावसाने रिमझिम बरसून पुणेकरांना दिलासा दिला आहे. राज्यावर पावसाचे हवामान पोषक असल्याने आज चांगला पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. शहरात दुपारी दीड वाजता आकाशात ढग जमा झाले आणि हलक्या सरी कोसळू लागल्या आहेत.
राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून बहुतेक भागांमध्ये जोरदार पाऊस झाला आहे. तरी देखील सरासरी पेक्षा हा पाऊस कमीच आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आजही (दि.१८) पावसाचा यलो अलर्ट जाहीर केला आहे. आज पुणे आणि मुंबईसह आणखी पाच जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट आहे. पुणे शहरात गेल्या आठवड्यात चांगलाच उकाडा जाणवत होता. पण दोन दिवसांपासून काही भागात पावसाचा जोर वाढल्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. तर शेतकऱ्यांनाही जरा धीर दिला आहे. आज राज्यातील पुणे, मुंबई, पालघर, ठाणे, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील इतर सर्व जिल्ह्यांना ग्रीन अलर्ट आहे. त्याचबरोबर कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
मध्य भारतातील कमी दाबाचे क्षेत्र पोषक ठरल्याने राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी कोसळत आहेत. आज सोमवारी (दि. १८) कोकण, घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.
मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा जैसलमेर, कमी दाब क्षेत्राचे केंद्र, सागर, दाल्टोनगंज जमशेदपूर, दिघा ते ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत कायम आहे.