पुणे - नानापेठेत झालेल्या रक्तरंजित गोळीबारातून वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला म्हणून आयुष उर्फ गोविंदा कोमकर (वय २४) याची निर्घृण हत्या करण्यात आली होती. गेल्या तीन दिवसांपासून आयुषचा मृतदेह ससून रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आला होता. अखेर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्याचे अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी परिसरात तणावपूर्ण तसेच भावनिक वातावरण होते.आयुषचे वडील गणेश कोमकर, जो सध्या नागपूर कारागृहात वनराज आंदेकर हत्या प्रकरणी शिक्षा भोगत आहे, तो पॅरोलवर सुटून आपल्या मुलाच्या अखेरच्या प्रवासाला उपस्थित राहिला. कारागृहातून थेट वैकुंठ स्मशानभूमीत पोहोचलेल्या गणेश कोमकरच्या डोळ्यांत दुःख दाटून आले होते.मात्र या अंत्यसंस्कारावेळी गणेशच्या हातात असलेले एक भेटकार्ड विशेष चर्चेचा विषय ठरले. हे कार्ड आयुषने तुरुंगात असताना वडिलांना पाठवले होते. त्यावर त्याने आपल्या वडिलांसाठी “आय लव्ह यू पप्पा” असे भावनिक शब्द लिहिले होते. त्याचबरोबर “नवीन ड्रेस पाठवलाय” असेही नमूद केले होते. कार्डावर काही बालपणीचे फोटोही चिकटवले होते. या कार्डामुळे वातावरण अधिकच भावनिक झाले.गोविंद कोमकरवर कडक पोलिस बंदोबस्तात सोमवारी (दि. ८) अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी वडील गणेश कोमकर वारंवार आक्रोश करत होते. ‘ज्या गुन्ह्याशी माझा काहीही संबंध नाही, त्याची शिक्षा माझ्या मुलाला दिली. बंडू आंदेकरने विनाकारण माझे नाव ओढले आणि माझ्या लेकराला बळी दिला’, असे ते रडताना म्हणाले. त्यांच्या या हंबरड्याने उपस्थितांना हेलावून सोडले.
कुटुंबाने सुरुवातीला मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला होता. मात्र पोलिसांनी दोन दिवस समजावल्यानंतर अखेर अंत्यसंस्कार पार पडले. ‘बंडू आंदेकर स्वतःच्या नातवाचाच जीव घेईल, असा कुणीही स्वप्नातही विचार केला नव्हता’, असे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.या प्रकरणी आतापर्यंत दोन आरोपींना अटक झाली असून इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे आंदेकर-कोमकर वादाला पुन्हा एकदा उफाळा आला असून परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी प्रमुख आरोपीसह १३ जणांवर गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.