Pune Walmik Karad: खंडणी प्रकरणातील आरोपी आणि बीडमधील सरपंच हत्या प्रकरणातील संशयित वाल्मिक कराड आज अखेर सीआयडीकडे शरण आला आहे. पवनचक्की कंपनीला खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर मागील २२ दिवसांपासून कराड हा फरार होता. वाल्मिक कराडसह सरपंच हत्या प्रकरणातील इतर फरार तीन आरोपींना अटक करावी, या मागणीसाठी बीडमध्ये नुकताच सर्वपक्षीय मोर्चाही काढण्यात आला होता. या मोर्चानंतर सरकारवर निर्माण झालेल्या दबावाच्या पार्श्वभूमीवर सीआयकडून वेगवान तपास सुरू होता. अशातच आज कराड स्वत:हून सीआयडी कार्यालयात हजर झाला. मात्र सीआयडीच्या अधिकाऱ्यांकडून जबाब लिहून घेतला जात असतानाच काही वेळानंतर कराडची तब्येत बिघडल्याची माहिती समोर आली.
सीआयडीकडे आत्मसमर्पण केल्यानंतर चौकशीदरम्यान वाल्मिक कराडची तब्येत बिघडली. त्यानंतर त्याला नातेवाईकांना औषधे आणून दिल्याचे समजते. त्याला रक्तदाबासंदर्भातील त्रास झाल्याचं बोललं जात आहे. याबाबत 'झी २४ तास' या वृत्तवाहिनीने वृत्त दिलं आहे.
दरम्यान, अनेक गुन्ह्यांतील आरोपी चौकशी टाळण्यासाठी किंवा चौकशीनंतर पोलीस कोठडी टाळण्यासाठी आजारपणाचं सोंग घेत असतात. वाल्मिक कराड प्रकरणातही ते होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण वाल्मिक कराड हजर होण्याच्या दोन दिवसांपासूनच त्याच्या जवळच्या लोकांकडून बीडमध्ये जिल्हा रुग्णालयात पाहणी करण्यात आल्याचे वृत्त समोर आले होते. म्हणजे वाल्मिक हा हजर झाल्यानंतर त्याला उपचाराच्या निमित्ताने रुग्णालयात हलवण्याची तयारी तो हजर होण्याच्या दोन दिवस आधीपासूनच सुरू होती की काय, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
दरम्यान, सीआयडीला शरण जाण्यापूर्वी कराडने एक व्हिडीओ जारी केला आहे. यामध्ये त्याने केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झाल्याचा आरोप केला आहे. मी सीआयडी ऑफिस पुणे येथे सरेंडर होत आहे. संतोष देशमुख यांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी, फाशी द्यावी. राजकीय द्वेषापोटी माझे नाव त्या प्रकरणाशी जोडले जात आहे. पोलीस तपासात जर मी दोषी दिसलो तर न्यायदेवता जी शिक्षा देईल ती भोगायला तयार आहे, असे कराड याने म्हटलं आहे.