त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
By विश्वास मोरे | Updated: May 25, 2025 19:21 IST2025-05-25T19:16:54+5:302025-05-25T19:21:28+5:30
या प्रकरणात आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही सुपेकर यांच्याबाबत गंभीर आरोप केले आहेत.

त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
पिंपरी :पिंपरी-चिंचवडमधील वैष्णवी कस्पटे-हगवणे हिच्या आत्महत्या प्रकरणात मामे-सासरे पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांनी हगवणे कुटुंबास मदत केल्याचा आरोप दोन दिवसांपूर्वी झाला. या घटनेच्या निमित्ताने सुपेकर यांचा आणखी एक कारनामा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उघड केला आहे. त्यांनी माध्यमांसमोर सादर केलेली ऑडिओ क्लिप समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. त्यावर गृहमंत्रालय काय निर्णय घेणार? सुपेकरांची चौकशी होणार का? अशी चर्चा होऊ लागल्या आहेत.
सासरच्या छळाला कंटाळून वैष्णवी हगवणे हिने आपलं आयुष्य संपवले. या प्रकरणात पोलिसांनी वैष्णवीचा पती, दीर, सासरा, नणंद आणि सासू यांना अटक केली आहे. वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे याची राष्ट्रवादीतून हकालपट्टी केली आहे. या प्रकरणात आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही सुपेकर यांच्याबाबत गंभीर आरोप केले आहेत.
त्यावर ‘आत्महत्येशी आणि पिस्तूल परवाना देण्यासंदर्भात माझा कोणताही संबंध नाही’, असे सुपेकर यांनी माध्यमांना सांगितले होते. त्यानंतर दमानिया यांनी पत्रकार परिषदेत ‘कारागृह साहित्य खरेदी प्रकरणातून नाव वगळावे,’ या संदर्भातील क्लिप ऐकविली. ‘याची सत्यता मी तपासली नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ती पाठविली आहे. त्यांनी तपासून कारवाई करावी’, अशी मागणी दमानिया यांनी केली आहे. या आवाजाची पुष्टी ‘लोकमत’नेही केली नाही.
ऑडिओ क्लिपही बनावट
माझे कोणात्यातरी अज्ञात व्यक्तीबरोबर संभाषण असलेली ऑडिओ क्लिप काही माध्यमातून प्रसारित केली जात आहे. याबाबत माझे म्हणणे आहे की, संबंधित ऑडिओ क्लिपही बनावट असून, आमची बदनामी करण्याच्या दृष्टीने हेतुपूर्वक प्रसारित केली जात आहे. त्यामुळे अशा छेडछाड केलेल्या ऑडिओ क्लिपद्वारे माझी बदनामी करणाऱ्या संबंधिताविरुद्ध अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहे.
-डॉ. जालिंदर सुपेकर, विशेष पोलीस महानिरीक्षक (कारागृह सेवा सुधार विभाग, महाराष्ट्र)