शिक्षित, पुढारलेल्या अनेक घरांमध्ये असंख्य वैष्णवींचा श्वास गुदमरतोय

By विश्वास मोरे | Updated: May 31, 2025 12:26 IST2025-05-31T12:26:04+5:302025-05-31T12:26:33+5:30

मागील वर्षी छळाच्या २०४ घटना, यावर्षी ७२ घटनांची नोंद; वर्षभरात २१ विवाहित महिलांनी आत्महत्या करून संपविला जीवनप्रवास

Vaishnavi Hagawane Death Case In many educated, advanced homes, countless Vaishnavites are suffocating | शिक्षित, पुढारलेल्या अनेक घरांमध्ये असंख्य वैष्णवींचा श्वास गुदमरतोय

शिक्षित, पुढारलेल्या अनेक घरांमध्ये असंख्य वैष्णवींचा श्वास गुदमरतोय

पिंपरी : सुधारणेचे, शिक्षणाचे माहेर घर असणाऱ्या पुण्यालगत आणि संत ज्ञानोबा- तुकोबांच्या भूमीची वाटचाल मेट्रो सिटीकडे सुरू आहे. श्रीमंतीचे दर्शन आणि प्रदर्शन घडविण्याची मानसिकता वाढत आहे. वैष्णवी हगवणे आत्महत्येच्या घटनेच्या निमित्ताने छळाच्या विळख्यात सापडलेल्या अगणिक वैष्णवींचा प्रश्न पुढे येत आहे. स्थानिक, शिक्षित, पुढारलेल्या अनेक घराघरांत असंख्य वैष्णवींचा श्वास गुदमरतो आहे. वर्षभरात २१ विवाहित महिलांनी आत्महत्या करून जीवन संपविले आहे. त्यामुळे स्त्री-पुरुष समानता कागदावरच आहे.

गाव ते महानगर आणि आता मेट्रोसिटी, स्मार्ट सिटी असा लौकिक प्राप्त करीत असताना अजूनही नागर संस्कृतीत महिलांना समान वागणूक दिली जात नाही, हे वास्तव आहे. याचे कारण कुटुंबाची विस्कटलेली घडी आणि संपत्तीतून आलेला उन्माद आहे.

जमिनीना भाव आल्याने श्रीमंतीचे दर्शन

श्रीमंती वाढल्याने छळवणुकीचे प्रकारही वाढले आहेत. वर्षात छळाच्या घटना २०४ घटना घडल्या आहेत, तर आजपर्यंत ७२ घटनांची नोंद आहे. गेल्या वर्षी विवाहिता आत्महत्येच्या २१ घटना घडल्या. 

शहराची प्रगती झाली मानसिकता तशीच

शहराची आर्थिक प्रगती झाली. मात्र, स्थानिकांमध्येच नव्हे तर शिक्षण घेतलेल्यामध्येही पुरुषी मानसिकता तशीच आहे. अजूनही असंख्य घरांत महिलांचा छळ होत आहे. छळले जात आहे. तिला बोलू दिले जात नाही, व्यक्त होऊ दिले जात नाही, पोलिसांच्या दप्तरी त्याची नोंद होत नाही.

खरंच, आपल्या भागातील आजची महिला सबल झाली आहे का? तिला कुटुंबात समानतेची वागणूक दिली जाते का? याबाबत विचार करण्याची गरज आहे. अजूनही चूल आणि मूल या फेऱ्यात महिलांना अडकवले गेले आहे. खरे तर, संस्कृतीमध्ये महिलेला, मातेला देव्हाऱ्यात स्थान आहे. शक्ती देवता आहे. आजच्या युगामध्ये सुनेला मुलीप्रमाणे वागणूक देतो का? दुर्दैवाची बाब म्हणजे आजकाल संपत्ती पाहून लग्न सोहळे आयोजित केले जातात. विवाहबंध संस्कृती आणि संस्कार पाहून करायला हवेत, असे वाटते.
- पुरुषोत्तम महाराज पाटील, प्रसिद्ध कीर्तनकार, आळंदी 

Web Title: Vaishnavi Hagawane Death Case In many educated, advanced homes, countless Vaishnavites are suffocating