Vaishnavi Hagawane Death Case : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी शशांक हगवणे (वय २३) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. मुळशी तालुक्यातील भुकूम येथे १६ मेला दुपारी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली. सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी मानसिक शारीरिक छळ करून क्रूर वागणूक देऊन वैष्णवी हिच्या मृत्यूस कारणीभूत झाले आहेत, अशी तक्रार पोलिसांकडे करण्यात आली.
वैष्णवीच्या वडील आनंद उर्फ अनिल साहेबराव कस्पटे (५१, रा. कस्पटे वस्ती, वाकड) यांनी याप्रकरणी १ ६ मेला बावधन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार वैष्णवी हिचा पती शशांक राजेंद्र हगवणे, सासू लता राजेंद्र हगवणे, सासरा राजेंद्र तुकाराम हगवणे, नणंद करीश्मा राजेंद्र हगवणे, दीर सुशील राजेंद्र हगवणे यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सद्यस्थितीत पीडित महिलेची सासू, नवरा, नणंद यांना अटक करण्यात आली असून फरार असलेले दीर आणि सासरे राजेंद्र हगवणे यांचा शोध पोलिस घेत आहेत.
वैष्णवीच्या मृत्युंनंतर वैष्णवीचे नऊ महिन्यांचे बाळ हे आईपासून पोरके झाले. वैष्णवीचे बाळ हे निलेश चव्हाण नावाच्या व्यक्तीकडे असल्याचा दावा तिच्या मामाने केला होता. निलेश चव्हाण हा वैष्णवीचा पती शशांक हगवणे याचा बिझनेस पार्टनर असल्याची माहिती समोर येत असून पुण्यातील कर्वेनगर भागातील औदुंबर सोसायटीत चव्हाण राहायला आहे. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने बाळाला ताब्यात देण्याचे आदेश दिले होते. अखेर वैष्णवीचे बाळ कस्पटे कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यात आले आहे.
बाणेरच्या हायवेवर बाळ अज्ञात व्यक्तीने कस्पटे कुटुंबियांकडे सोपवले आहे. याबाबत वैष्णवीच्या कुटुंबीयांनी सांगितले की, आम्हाला एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला होता. त्याने तुम्ही ज्या बाळाच्या शोधात आहात ते माझ्याकडे आहे, मला ते तुम्हाला द्यायचे आहे असे त्याने फोनवरून संगितले. आणि आम्हाला बाणेर हायवेला बाळ घेण्यासाठी बोलवले. तिथं गेल्यावर त्या अज्ञात व्यक्तीने बाळ आमच्या ताब्यात दिले. आता आम्हाला खूप आनंद होतोय. बाळ आता सुखरूप आहे. त्याला आम्ही आयुष्यभर सांभाळू अशी प्रतिक्रिया बाळाच्या आजोबानी यावेळी दिली आहे.आरोपीला लवकरात लवकर पकडावं अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.