किरण शिंदे, पुणेमयत वैष्णवी हगवणेचे वडील आणि कुटुंबीय नऊ महिन्याच्या तिच्या मुलाला घेण्यासाठी गेले. त्यावेळी निलेश चव्हाण याने बंदूक दाखवून धमकी दिली. त्यामुळे ते मुलाला न घेताच परत आले होते. अखेर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
कर्वेनगर परिसरातील रहिवासी निलेश रामचंद्र चव्हाण याच्याविरुद्ध वारजे पोलीस ठाण्यात भारतीय नवीन फौजदारी संहिता (BNS) अंतर्गत कलम 351(3) तसेच शस्त्र कायदा कलम 30 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बंदूक दाखवून जीवे मारण्याची दिली होती धमकी
ही घटना 19 मे रोजी घडली होती. कस्पटे कुटुंब त्यांच्या नातवाला ताब्यात घेण्याकरिता निलेश चव्हाण याच्या घरी गेले होते. त्याने त्यांना धमकी दिली असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. आरोपीने त्यांच्या कुटुंबाला शस्त्र दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली, असे पोलिसांनी सांगितले.
वाचा >>फरार राजेंद्र हगवणेच्या सख्ख्या भावाला पोलिसांनी घेतलं ताब्यात, संशय काय?
घटनेनंतर कस्पटे कुटुंबाने त्वरित वारजे पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला. कलम 351(3) हे शारीरिक इजा करण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीस उद्देशून असून, शस्त्र कायद्याखालील कलम 30 हे बेकायदेशीर शस्त्र बाळगणे वा त्याचा वापर केल्याबद्दल संबंधित आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचा मागील काही काळापासून कस्पटे कुटुंबासोबत कौटुंबिक वाद सुरू होता. सध्या पोलीस अधिक तपास करत असून, संबंधित शस्त्र जप्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणामुळे करव्हेनगर व वारजे परिसरात खळबळ उडाली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.