संजय नहार यांच्यासाठीच्या पार्सल बॉम्बचा संबंध वैभव राऊतशी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2018 23:26 IST2018-08-13T23:24:11+5:302018-08-13T23:26:10+5:30
राष्ट्रीय सुरक्षा एजन्सीकडून चौकशी; नालासोपारात पुन्हा छापा

संजय नहार यांच्यासाठीच्या पार्सल बॉम्बचा संबंध वैभव राऊतशी
पुणे : नालासोपारा येथून अटक केलेल्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडे सापडलेले साहित्य आणि सामाजिक कार्यकर्ते संजय नहार यांच्यासाठी अहमदनगरच्या कुरिअर कार्यालयातून पाठवण्यात येणार असलेले पार्सलमधील साहित्य यांच्यात साधर्म्य असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे हिंदुत्ववादींनीच हा पार्सल बॉम्ब पाठवला होता का, याचा तपास केंद्रीय सुरक्षा एजन्सीकडून सुरु करण्यात आला आहे. वैभव राऊत आणि सुधन्वा गोंधळेकर यांचा त्याच्याशी संबंध आहे का, याचा शोध घेतला जात आहे. त्यासाठी एटीएसने आज पुन्हा वैभवच्या घरी व दुकानात जाऊन तपास केला.
काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याचे काम करणाऱ्या सरहद्द संस्थेचे संजय नहार यांच्या नावाने अहमदनगरच्या कुरिअर कार्यालयात २० मार्च २०१८ रोजी एक पार्सल पाठवण्यात आले होते. माळीवाडी येथील मारुती कुरिअरमध्ये दुपारी एका व्यक्तीने हे पार्सल दिले होते. रात्री सव्वा दहा वाजता कुरिअर कंपनीतील संदीप भुजबळ आणि संजय क्षीरसागर यांनी हे जड पार्सल पाहिले व त्यावरील चिठ्ठी वाचली. ही चिठ्ठी एका मुलीने लिहिलेली होती. त्यावर तुम्ही मला खूप मदत केली. त्यामुळे हे पार्सल पाठवत आहे, असे लिहिले होते. ही चिठ्ठी पाहून संशय आल्याने त्यांनी हे पार्सल उघडून लाइट बोर्डासमोर धरले असता त्याचा स्फोट झाला होता. त्यात दोघे जखमी झाले होते.
नालासोपारा येथे वैभव राऊत याच्या घरातून व दुकानातून एटीएसने जप्त केलेल्या साहित्यात तयार बॉम्ब व बॉम्ब तयार करण्याचे साहित्य आढळून आले आहे. हे साहित्य आणि संजय नहार यांच्यासाठी पाठवण्यात आलेल्या पार्सलमधील साहित्य यात बराच सारखेपणा आढळून आला आहे. याबाबत संजय नहार यांनी सांगितले की, आज दिल्लीहून आपल्याला राष्ट्रीय सुरक्षा एजन्सीतील (एनआयए) एका अधिकाऱ्याचा फोन आला होता. त्याने या पार्सल बॉम्बविषयी चौकशी केली. नालासोपारा येथे सापडलेले साहित्य आणि मला पाठवलेल्या पार्सलमधील बॉम्बमध्ये वापरलेले साहित्य यातील साधर्म्याबद्दल आपल्याला कोणतीही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.