पुणे : विमान प्रवाशांना विमानतळावर पिण्याच्या पाणी, चहा, कॉफी, वडापाव स्वस्तात मिळावा, यासाठी उड्डाण योजनेअंतर्गत नव्या टर्मिनलवर उड्डाण यात्री कॅफे सुरू करण्यात आला आहे. या कॅफेचे उद्घाटन केंद्रीय नागरी हवाइ राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केले. या कॅफेत वडापाव २० रुपये, पाणी बॉटल १० रुपये आणि चहा १० रुपयाला मिळणार आहे. हा कॅफे २४ तास खुला असणार आहे. त्यामुळे प्रवाशांना कमी दरात पदार्थांची चव चाखता येणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार देशात अनेक विमानतळावर उड्डाण यात्री कॅफे सुरू करण्यात येत आहे. सध्या देशात कलकत्ता, चैन्नइ, अहमदाबाद आणि आता पुण्यात उड्डाण यात्री कॅफे सुरू झाली आहे. त्यामुळे लोहगाव येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांना आता स्वस्तामध्ये चहा-कॉफी उपलब्ध झाली आहे. यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून, कमी दरात चहा, काॅफी, पाणी बाटली, वडापाव समोसा याची चव चाखता येणार आहे. विमानतळावर प्रवास करणाऱ्या सामान्य व्यक्तीला तेथील चहा, कॉफीचे दर परवडत नाहीत. त्यामुळे विमान वाहतूक मंत्रालयाने प्रवाशांना विमानतळावर स्वस्त दरामध्ये खाद्यपदार्थ मिळावेत म्हणून उडाण यात्री कॅफे योजना सुरू केली. त्यानुसार कोलकता येथील नेताजी सुभाषचंद्र बोस विमानतळावर पहिले उडान कॅफे सुरू करण्यात आले होते. आता पुण्यात ही योजना सुरू केल्यामुळे विमान प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
मुंबई विमानतळावर लवकरच उड्डाण यात्री कॅफे
पुण्यानंतर मुंबई विमानतळावर लवकरच उड्डाण कॅफे सुरू करण्यात येणार आहे. तसेच केंद्र सरकारकडून विमान प्रवास वाढावा, यासाठी नागरिकांना प्रोत्साहन केले जात आहे. त्यासाठी नवीन विमानतळे सुरू केली जात आहेत. तर, जुन्या विमानतळाचा विकास करून त्याठिकाणी आधुनिक सुविधा दिल्या जात आहे. तसेच देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानांची संख्यादेखील वाढविण्यात येत आहे, असेही मुरलीधर मोहोळ यांनी म्हणाले.
उडान यात्री कॅफेत हे मिळणार
पदार्थ दर
चहा - १०काॅफी - २०पाणी बाटली - १०समोसा - २०वडापाव - २०
सर्वसामान्य प्रवाशांना कमी दरात चहा, काॅफी, वडापाव उपलब्ध व्हावी, यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. पुण्यातील प्रवाशांना याचा फायदा होणार आहे. -मुरलीधर मोहोळ, केंद्रीय नागरी हवाइ राज्यमंत्री