जिल्ह्यात शुक्रवारी लसीकरणाचा उच्चांक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:09 IST2021-06-26T04:09:28+5:302021-06-26T04:09:28+5:30
एकाच दिवसात १ लाख २५ हजार १७० जणांचे लसीकरण : ७४९ केंद्रांवर दिल्या लसी लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ...

जिल्ह्यात शुक्रवारी लसीकरणाचा उच्चांक
एकाच दिवसात १ लाख २५ हजार १७० जणांचे लसीकरण : ७४९ केंद्रांवर दिल्या लसी
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जिल्ह्यात शुक्रवारी एकाच दिवसात तब्बल १ लाख २५ हजार १७० नागरिकांना लस देण्यात आली. लसीकरणाला सुरुवात झाल्यापासूनचा एका दिवसात झालेल्या लसीकरणाचा हा उच्चांक आहे. ७४९ केंद्रांवर हे लसीकरण झाले असून, हा वेग असाच कायम राहिल्यास लवकरच संपूर्ण जिल्ह्याचे लसीकरण पूर्ण करता येणार असल्याची माहिती लसीकरण अधिकारी डॉ. सचिन येडके यांनी दिली.
जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी लसींचा तुटवडा असल्यामुळे लसीकरण हे संथ गतीने होत होते. त्यात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण बंद करण्यात आले होते. ज्येष्ठ नागरिक तसेच दुसऱ्या डोसला प्राधान्य देण्याच्या सूचना प्रशासनातर्फे आरोग्य विभागाला देण्यात आल्या होत्या. प्राप्त लसींच्या डोसनुसार जिल्ह्यात लसीकरणाचे नियोजन केले जात होते. जिल्ह्यात एकूण ३ हजार ५० लसीकरण केंद्रे आहे. मात्र, यातील काहीच केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यासाठी ३ लाख लसींचे डोस आले होते. त्यानुसार लसीकरणाचे नियोजन सुरू होते. शुक्रवारी तब्बल ७४९ केंद्रांवर १ लाख २५ हजार १७० जणांना लस देण्यात आली. ही संख्या आतापर्यंतची विक्रमी संख्या आहे. ७४९ लसीकरण केंद्रापैकी ५५० केंद्र शासनाचे आहेत. तर १९९ केंद्र हे खाजगी आहेत. एका तासात सर्वाधिक २३ हजार ५५७ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. हा वेग कायम राहिल्यास लवकरच लसीकरण पूर्ण करता येणे शक्य आहे. मात्र, त्या पद्धतीने लसींचा पुरवठा होणे गरजेचे आहे, असे येडके म्हणाले.
चौकट
जिल्हा प्रशासनाने शंभर दिवसांत लसीकरण पूर्ण करण्याचे उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवुन मिशन हंड्रेड मोहीम हाती घेतली होती. पहिल्या पहिल्या दिवसी लाखाच्या आसपास लसीकरण झाले. मात्र, त्यानंतर पुरेश्या प्रमाणात लस उपलब्ध न झाल्याने मोहीम गुंडाळण्यात आली. लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी जिल्ह्यात ३ हजार ५० लसीकरण केंद्रांना परवानगी देण्यात आली. परंतु लसीचा पुरवठा मागणीप्रमाणे होत नसल्याने अनेक लसीकरण केंद्र बंद ठेवावे लागत आहेत. गेल्या काही दिवसांत लसींचा पुरवठा सुरळीत होत असल्याने लसीकरणाची गती वाढली आहे.