मास्कचा योग्य वापर करा अन् संसर्गजन्य आजारांना दूर ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:09 IST2021-06-26T04:09:22+5:302021-06-26T04:09:22+5:30
हवामानातील बदल, पावसाळ्यात हवेतील आर्द्रता, विविध विषाणूचा प्रादुर्भाव यामुळे दरवर्षी जून महिन्यात सर्दी, खोकला, डोकेदुखी, ताप, अंगदुखी, अशक्तपणा अशा ...

मास्कचा योग्य वापर करा अन् संसर्गजन्य आजारांना दूर ठेवा
हवामानातील बदल, पावसाळ्यात हवेतील आर्द्रता, विविध विषाणूचा प्रादुर्भाव यामुळे दरवर्षी जून महिन्यात सर्दी, खोकला, डोकेदुखी, ताप, अंगदुखी, अशक्तपणा अशा तब्येतीच्या तक्रारी उद्भवू लागतात. त्यामुळे डॉक्टरांकडे येणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही या काळात वाढते. बाह्यरुग्ण विभागात रुग्णांची मोठ्या प्रमाणात गर्दी पहायला मिळते. यंदा मात्र रुग्णांचे प्रमाण कमी झाले असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. मास्कचा वापर आजारांचे प्रमाण कमी करण्यास कारणीभूत ठरत आहे.
जनरल फिजिशियन डॉ. नलिनी भोसले म्हणाल्या, ''मास्कचा वापर हा आपल्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग झाला आहे. लोकांनाही मास्कच्या वापराचे फायदे आणि महत्व बऱ्यापैकी समजले आहे. कोणत्याही विषाणूचा शरीरात शिरकाव सर्वसाधारणपणे नाक किंवा तोंडातून येतो. एखाद्या आजाराचा प्रादुर्भावही खोकला, शिंक, थुंकी इत्यादी माध्यमातून होतो. मास्कच्या वापरामुळे तोंड आणि नाक कायम झाकलेले राहत आहे. त्यामुळे धूलिकण अथवा विषाणू कमी प्रमाणात शरीरात प्रवेश करतात. म्हणूनच कोरोना काळात इतर संसर्गजन्य आजारांचे रुग्ण कमी प्रमाणात पहायला मिळत आहेत. भारतासारख्या कोट्यावधी लोकसंख्या असलेल्या देशात सोशल डिस्टन्सिंग काटेकोरपणे पाळले जात नाही. अशा परिस्थितीत किमान दर्जेदार मास्कचा योग्य वापर अत्यंत आवश्यक आहे.''
''कोरोनाच्या भीतीने नागरिकांच्या आहारशैलीत, जीवनशैलीतही बदल झाला आहे. व्यायाम आणि आहाराच्या माध्यमातून आरोग्य उत्तम राखण्याकडे लोकांचा कल दिसून येत आहे. त्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत झाली आहे. आयुर्वेदिक उपायांचा घरोघरी नियमितपणे अवलंब केला जात आहे. त्यामुळेही दर वर्षीच्या तुलनेत यंदा संसर्गजन्य आजारांच्या तक्रारी कमी प्रमाणात पाहायला मिळत आहेत. लोकांनी कोरोनाची साथ ओसरली आहे, या भ्रमात न राहता मास्क, सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर या नियमांचे कायमस्वरूपी पालन करायला हवे, असे आवाहन कन्सलटिंग फिजिशियन डॉ. अनिकेत देशपांडे यांनी केले.
----
कसा वापरावा मास्क ?
- दररोजच्या वापरातला मास्क किमान तीन पदरी आणि जास्तीत जास्त पाच पदरी असावा.
- आपल्याकडे अनेक लोकांना अद्याप मास्क वापरण्याचे तंत्र कळलेले नाही. अनेकदा लोक एकटे असताना, एकट्याने प्रवास करताना नाक आणि तोंड झाकले जाईल अशा योग्य पद्धतीने मास्क वापरतात. मात्र दुकानात गेल्यावर अथवा कोणालाही भेटल्यावर तोंडावरचा मास्क हनुवटीवर घेऊन बोलायला सुरुवात करतात. अशाने कोरोनाच्या संसर्गाची शक्यता वाढते.
- मास्कने कायम आपले नाक आणि तोंड पूर्ण झाकलेले असले पाहिजे. मास्कचा दर्जाही चांगल्या पद्धतीचा असावा.
- दोन मास्क वापरताना एक नाका-तोंडावर आणि दुसरा हनुवटीवर अशा पद्धतीने घातलेला असेल तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही.
- सर्जिकल मास्क आणि एन नाईंटी फाईव्ह मास्क वापरण्याने बराच फायदा होतो. खूप गर्दी असलेल्या ठिकाणी जाताना दुहेरी मास्क वापरणे बंधनकारक मानले पाहिजे.
- एकमेकांच्या संपर्कात येणाऱ्या दोन व्यक्तींपैकी एकाने मास्क लावला नसेल तरीही संसर्गाचा धोका वाढतो. याउलट दोन्ही व्यक्तींनी दुहेरी मास्क लावले असतील तर संसर्गाची शक्यता अनेक पटींनी कमी होते.