उरुळीची वाहतूककोंडी फुटणार..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 00:02 IST2018-08-31T00:02:09+5:302018-08-31T00:02:26+5:30
नित्याचीच समस्या : पोलीस यंत्रणा कामाला

उरुळीची वाहतूककोंडी फुटणार..!
उरुळी कांचन : उरुळी कांचन परिसरात होणारी वाहतूककोंडी नित्याचीच आहे. या परिसरात वाहतुकीचे नियम न पाळता वाहतूक व्यवस्था पूर्णपणे बेशिस्तपणाचे दर्शन घडवत असते. या वाहतूककोंडीने सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे; पण यावर नेमका तोडगा काढून जनतेला दिलासा देणारी कोणतीच यंत्रणा किंवा योजना कार्यान्वित करण्यासाठी पोलीस प्रशासन, राष्ट्रीय महामार्ग प्रशासन किंवा ग्रामपंचायत प्रशासनाला दिसत नव्हते. ‘ही उरुळी कांचन परिसराची शोकांतिका’ या आशयाची बातमी ‘लोकमत’मध्ये मंगळवारच्या (दि.२८) अंकात प्रसिद्ध झाली.
या बातमीची तत्काळ दखल घेत लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील यांनी पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले, उपविभागीय अधिकारी सुहास गरुड यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूककोंडीमुक्त पुणे-सोलापूर रस्ता करण्याच्या दिशेने वाटचाल सुरु करून आपल्या अखत्यारीत स्वतंत्र वाहतूक पोलीस विभाग सुरु केला आहे. या विभागासाठी एक पोलीस उपनिरीक्षक नियुक्त करून त्यांच्याबरोबर प्रत्येक पोलीस चौकीचा एक पोलीस कर्मचारी मदतीला देण्याचा निर्णय घेतला तसेच लोणी काळभोर, कुंजीरवाडी, उरुळी कांचन, देवाची उरुळी, वडकी आदी ग्रामपंचायतींना एक एक वाहतूक वॉर्डन देण्याची विनंती केली. ती मागणी बहुतेक सर्व ग्रामपंचायतींनी मान्य केल्याने हे काम आणखी सुकर होणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांनी दिली. ते म्हणाले, वाहतूक नियंत्रण करणाऱ्या कर्मचाºयांनी फक्त वाहतूक सुरळीत राहील याची दक्षता घ्यायची अशा सूचना देत अवैध व अस्ताव्यस्त पार्किंग करणारी वाहने आणि वाहनचालकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
तसेच सातत्याने वाहतूक सुरळीत करण्यासाठी काही मौलिक सूचना देण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीच्या दोन प्रतिनिधींचा समावेश असलेली तसेच काही अधिकारी व एक सल्लागार समिती नियुक्त केली. त्यांच्या सूचनांच्या आधारित वाहतूक नियंत्रण करण्याच्या कामात
सुधारणा करण्यात येतील असेही पाटील यांनी सांगितले.