पुणे: जमीन वापरात झालेला बदल, वेगाने होणारे शहरीकरण आणि विशिष्ट विश्लेषणासाठी किंवा निर्णयासाठी आवश्यक असलेली माहिती उपलब्ध नसणे किंवा त्यामध्ये अपूर्णता असणे या घटकांमुळे चतुरांच्या संख्येमध्ये घट झाली आहे. पुण्यातील चतुराचे ८ प्रकार नामशेष झाल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले आहे. गेल्या काही वर्षांमधील संशोधनात हा बदल नोंदविण्यात आला.
एमआयटी-वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे येथील संशोधकांनी पुण्यातील ड्रॅगनफ्लाय (चतुर) प्रजातींच्या ऐतिहासिक आणि सध्याच्या माहितीच्या आधारे त्यांच्या संख्येतील बदलांचे विश्लेषण करणारा महत्त्वपूर्ण अभ्यास सादर केला आहे. या संशोधनात निदर्शनास आले आहे की, ऐतिहासिक नोंदींमध्ये असलेले ड्रॅगनफ्लायचे आठ प्रकार पुण्यात आता दिसत नाहीत. म्हणजे त्या कदाचित नामशेष झाल्या असण्याची शक्यता आहे. हा महत्त्वपूर्ण अभ्यास 'इंटरनॅशनल जर्नल ऑफ ट्रॉपिकल इन्सेक्ट सायन्स'मध्ये (स्प्रिंगर नेचर पब्लिशिंग) प्रकाशित केला आहे.
या प्रकारचा हा पहिलाच अभ्यास आहे. जवळपास दोन शतकांमध्ये प्रजातींची झालेली वाढ आणि घट याबाबत नव्याने माहिती समोर आली आहे. डॉ. पंकज कोपर्डे (फॅकल्टी, पर्यावरण अध्ययन विभाग, एमआयटी - वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे) यांनी या संशोधनाचे नेतृत्व केले असून, अर्जुष पायरा (पीएचडी स्कॉलर) आणि अमेय देशपांडे (माजी विद्यार्थी) यांच्या सहकार्याने हे संशोधन झाले. या अभ्यासात ऐतिहासिक आणि समकालीन नोंदींचे सखोल विश्लेषण केले. प्राथमिक डेटा 2019 ते 2022 या कालावधीत पुणे जिल्ह्यातील 52 ठिकाणांहून गोळा करण्यात आला, तर 19व्या शतकाच्या मध्यकालीन नोंदींसाठी 25 प्रकाशित लेख आणि सिटीझन सायन्स डेटाचा आढावा घेतला.
ड्रॅगनफ्लाय हे अत्यंत महत्त्वाचे कीटक शिकारी असून, ते शहरी भागातील डास आणि अन्य कीटकांची संख्या नियंत्रित करण्यास मदत करतात. जंगलातील परिसंस्थेमध्ये वाघ जशी महत्त्वाची भूमिका बजावतो, तसेच ड्रॅगनफ्लाय पर्यावरणीय समतोल राखण्यास उपयुक्त ठरतात. त्यांच्या संख्येचे निरीक्षण करणे पर्यावरणाच्या आरोग्याचे मूल्यमापन करण्यासाठी आवश्यक आहे. - डॉ. पंकज कोपर्डे, प्रमुख संशोधक
डोंगर, गवताळ प्रदेश, नद्या आणि तलाव यांसारख्या शहरी हरित आणि निळ्या परिसंस्थांचे संवर्धन प्राधान्याने करणे आवश्यक आहे. वेगवान शहरी विस्ताराच्या पार्श्वभूमीवर नैसर्गिक परिसंस्थांचे संरक्षण करण्यासाठी शाश्वत विकास नियोजन अत्यंत महत्त्वाचे आहे. -अर्जुष पायरा, सहसंशोधक
कारणे काय ?
अनियोजित शहरीकरण, पाण्याचे वाढलेले प्रदूषण आणि हवामानाच्या ऋतूचक्रात होणारे बदल ही यामागील कारणे असू शकतात. ऐतिहासिक नोंदींशी तुलना करता २७ नव्या प्रजाती आढळून आल्याची नोंदही झाली आहे. हौशी नागरिक आणि कीटकांच्या वैविध्यतेबद्दल असलेल्या दस्तावेजीकरणाच्या वाढत्या जागरुकतेमुळे हे शक्य झाले आहे.
पाच नव्या प्रजातींची नोंद
या अभ्यासात पश्चिम घाटातील पाच स्थानिक प्रजातींची नोंद करण्यात आली. त्यामुळे पुणे हे ओडोनेटाच्या (ड्रॅगनफ्लाय आणि डॅम्सेलफ्लाय) अभ्यासासाठी महत्त्वाचे ठिकाण असल्याचे अधोरेखित होते.