पुणे विद्यापीठाशी संलग्न प्राध्यापकांच्या वेतननिश्चिती शिबिराचे नियोजन चुकले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2020 02:32 PM2020-01-08T14:32:18+5:302020-01-08T15:02:42+5:30

पहिलाच दिवस असल्याने यंत्रणा लावण्यास वेळ गेला...

University of Pune missed the planning in the camp of professor | पुणे विद्यापीठाशी संलग्न प्राध्यापकांच्या वेतननिश्चिती शिबिराचे नियोजन चुकले

पुणे विद्यापीठाशी संलग्न प्राध्यापकांच्या वेतननिश्चिती शिबिराचे नियोजन चुकले

Next
ठळक मुद्देविभागीय उच्च शिक्षण विभागाचे वाडिया महाविद्यालयात शिबिरअहमदनगर, नाशिक व पुणे शहर व ग्रामीण भागातील महाविद्यालयांचे प्रस्ताव

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न अहमदनगर जिल्ह्यातील महाविद्यालयांमधील प्राध्यापकांच्या वेतननिश्चितीसाठी आयोजिण्यात आलेल्या शिबिरात एकाही प्राध्यापकाचे वेतननिश्चितीचे काम झाले नाही. त्यामुळे रजा घेऊन व अहमदनगर जिल्ह्यातून काही तासांचा प्रवास करून आलेल्या प्राध्यापकांनी संताप व्यक्त केला. तसेच शिक्षण विभागाने तयारी न करता शिबिराचे आयोजन का केले? असाही प्रश्न प्राध्यापकांनी यावेळी उपस्थित केला.
पुणे विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयाने विद्यापीठाशी संलग्न सर्व महाविद्यालयांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतननिश्चितीसाठी ६ जानेवारी ती १० जानेवारी या कालावधीत शिबिराचे आयोजन करण्यात आले. त्यासाठी अहमदनगर, नाशिक व पुणे शहर व ग्रामीण भागातील महाविद्यालयांचे प्रस्ताव मागविले होते. शिक्षण विभागाकडून विद्यापीठ व महाविद्यालयात नव्याने नियुक्त झालेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची वेतननिश्चिती, कॅस अंतर्गत पदोन्नतीसाठी विद्यापीठाने शिफारस केलेल्या शिक्षकांची वेतननिश्चिती व इतर प्रलंबित वेतननिश्चितीच्या प्रस्तावाची छाननी करून पात्र ठरणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या प्रस्तावांना मान्यता दिली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार सोमवारी अहमदनगर जिल्ह्यातील प्राध्यापक वाडिया महाविद्यालयात प्रस्ताव घेऊन दाखल झाले. परंतु, शिक्षण विभागाची तयारी न करताच शिबिर आयोजित केले. त्यामुळे एकाही प्राध्यापकाच्या वेतननिश्चितीचे काम होऊ शकले नाही. शिबिर आयोजित करून एकही प्राध्यापकाची वेतननिश्चिती होत नाही, असे प्रथमच घडले आहे. जामखेड महाविद्यालयाचे प्राचार्य अविनाश फलके म्हणाले, की महाविद्यालयाचे लिपीक व प्राचार्य शिक्षण विभागाने आयोजिलेल्या शिबिरात प्रस्ताव घेऊन येत असतात. त्यानुसार अहमदनगर जिल्ह्यातील अनेक प्राचार्य आपले प्रस्ताव घेऊन आले होते. मात्र, पहिल्या दिवशी मोठ्या संख्येने आलेले प्रस्ताव पाहून शिक्षण विभागाने केवळ प्रस्ताव जमा करून घेतले. वेतननिश्चिती करण्यासाठी काही दिवसांचा वेळ मागून घेतला.
.............
पहिलाच दिवस असल्याने यंत्रणा लावण्यास वेळ गेला...
पुणे शहर व ग्रामीण भागातील महाविद्यालयांच्या वेतननिश्चितीसाठी ८ व ९ जानेवारी हा कालावधी देण्यात आला आहे. त्यामुळे उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयाने योग्य नियोजन करून पुण्यातील वेतननिश्चितीची कामे पूर्ण करावीत, अशी अपेक्षा प्राध्यापक संघटनांकडून व्यक्त केली जात आहे.
..............
शिबिराचा पहिलाच दिवस असल्यामुळे सोमवारी वाडिया महाविद्यालयात आवश्यक यंत्रणा लावण्यास वेळ गेला. तसेच मान्यतेसाठी आलेल्या प्रस्तावांची संख्या मोठी होती. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील वेतननिश्चितीच्या प्रस्तावांना मान्यता देणे शक्य झाले नाही. तसेच प्राध्यापकांना शिबिरासाठी बोलवले नव्हते. प्राचार्यांनी त्यांच्या लिपिकाला घेऊन येणे अपेक्षित होते; परंतु शनिवारी, रविवारी सुटीच्या दिवशी वेतननिश्चितीची कामे पूर्ण केली जातील.- डॉ. मोहन खताळ, उच्च शिक्षण, सहसंचालक, पुणे विभाग.
..............
शिक्षण विभागाने वेतननिश्चितीसाठी शिबिर आयोजिले असले तरी नियोजनाअभावी एकाही प्राध्यापकाचे व शिक्षकेतर कर्मचाऱ्याच्या वेतननिश्चितीच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली नाही. शिबिरात एकाच दिवशी सर्व कामे होत असल्याने नगर जिल्ह्यातील सुमारे २४० प्राध्यापकांचे प्रस्ताव आले होते. परंतु, नव्याने नियुक्त झालेल्या प्राध्यापकांच्या मान्यता प्रथम घेण्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले. जिल्ह्यातील प्रस्तावांना मान्यता देण्यासाठी ८ ते १० दिवसांचा वेळ लागेल. - के. एल. गिरमकर, अध्यक्ष, स्पुक्टो

Web Title: University of Pune missed the planning in the camp of professor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.