केंद्रीय मंत्र्यांच्या कर्मचाऱ्याला गजानन मारणेच्या गुंडांकडून मारहाण; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "मुख्यमंत्र्यांनी..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 14:37 IST2025-02-21T13:47:14+5:302025-02-21T14:37:31+5:30
पुण्यात केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कर्मचाऱ्याला कुख्यात गुंडांच्या टोळीकडून मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे.

केंद्रीय मंत्र्यांच्या कर्मचाऱ्याला गजानन मारणेच्या गुंडांकडून मारहाण; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "मुख्यमंत्र्यांनी..."
Pune Crime: पुण्यात गुन्हेगारीच्या घटना थांबवण्याचे नाव घेत नाहीये. पोलिसांकडून कडक कारवाई होत असली तरी पुण्यातील वाढती गुन्हेगारी चिंतेचा विषय बनला आहे. अशातच पुण्यात आता केंद्रीय मंत्र्यांच्या कर्मचाऱ्यावरही कुख्यात गुंडाच्या टोळीने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे आता सामान्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. गुंड गजानन मारणे टोळीतील गुंडांनी केंद्रीय नागरी उद्यान मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या जवळच्या व्यक्तीला मारहाण केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यावरुनच खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याप्रकरणी लक्ष घालण्याची मागणी केली आहे.
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयाती कर्मचाऱ्याला कुख्यात गुंड गजानन मारणे याच्या टोळीतील गुंडांनी क्षुल्लक कारणावरुन मारहाण केली. कोथरूड भागात गाडीचा धक्का लागल्याच्या वादातून मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयात सोशल मीडियाचं काम पाहणाऱ्या देवेंद्र जोग यांना मारहाण करण्यात आली. या सगळ्या घटनेवरुन खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात केंद्रीय मंत्र्यांचे निकटवर्तीय देखील सुरक्षित नसल्याचे म्हटलं आहे.
"पुणे शहरात केंद्रीय मंत्री महोदयांचे निकटवर्तीय देखील सुरक्षित नाहीत. कुख्यात गुंडाने पुण्यातील केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या स्टाफमधील काही कर्मचाऱ्यांवर हल्ला करून जखमी केले. केंद्रीय मंत्रीमहोदयांची ही अवस्था तर सर्वसामान्य जनतेचे काय हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. गेली काही दिवस पुण्यात गुंडांनी उच्छाद मांडला आहे. भररस्त्यतात रिव्हॉल्व्हर काढणे, हाणामारी प्रकार नेहमीच घडताना दिसत आहेत. मुख्यमंत्री महोदयांनी यात तातडीने लक्ष घालून शहराची कायदे सुव्यवस्था रुळावर आणण्यासाठी प्रयत्न करतो," असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
शिवजयंतीच्या दिवशी कोथरूड परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून मिरवणूक निघाली होती. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे काम करणारे देवेंद्र जोग हे कोथरूड भागातील भेलके नगर परिसरातून दुचाकीवरून निघाले असता गजानन मारणे टोळीतील सदस्यांनी त्यांच्या गाडीला कट मारला. त्यावेळी गाडीमध्ये बाबू पवार, किरण पडवळ, ओम तीर्थराम आणि अमोल तापकीर हे चौघे होते. कट मारल्याने देवेंद्र जोग यांनी चौघा जणांकडे रागाने बघितलं. याचाच राग आल्याने चौघांनी मिळून देवेंद्र जोग यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत जोग यांच्या नाकाला नाकाला गंभीर दुखापत झाली असून उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
या प्रकरणी कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये चौघांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौघांपैकी तीन आरोपींना कोथरूड पोलिसांकडून अटक केली आहे. तर एकजण अद्याप फरार आहे. दुसरीकडे, या घटनेनंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्हिडीओ कॉल करून देवेंद्र जोग यांची विचारपूस केल्याचे म्हटलं जात आहे.