Unfortunate death of a young boy to get hanged | गोठ्यात खेळत असताना गळफास लागून लहान मुलाचा दुर्दैवी मृत्यू
गोठ्यात खेळत असताना गळफास लागून लहान मुलाचा दुर्दैवी मृत्यू

पुणे (सासवड) : शेतात सकाळ पासून काम केल्यानंतर दुपारी कडक उन लागत असल्याने घरातील सर्वानीच शेतातील अंजिराच्या बागेत काही काळ विश्रांती घेतली. त्याच कुटुंबातील एक लहान शालेय विद्यार्थी झोप येत नसल्याने बांधावरच असलेल्या पत्राच्या शेड वजा गोठ्यात एकटाच खेळत होता. परंतु हाच खेळ त्याच्या जीवावर असा बेतला कि त्याला त्याची पुसटशीही कल्पना आली नाही. गोठ्यात बैलाला बांधण्याच्या म्होरकी मध्ये त्याचा गळा गुंतला आणि फास लागून त्याचा त्यात दुर्दैवी अंत झाला. याघटनेमुळे या कुटुंबासह संपूर्ण गावावर एकच शोककळा पसरली आहे.

   शुभम सत्यवान पवार, वय - १३. रा. उदाचीवाडी, ता. पुरंदर. असे या घटनेत दुर्दैवी मरण पावलेल्या मुलाचे नाव असून याबाबत गावच्या पोलीस पाटील रुपाली कुंभारकर यांनी सासवड पोलीस ठाण्यात घटनेची खबर दिली आहे.  मयत शुभमचे आई - वडील, एक लहान भाऊ आणि इतर सर्व सदस्य त्यांच्या अंजिराच्या बागेत काम करीत होते. दुपारी कडक उन्ह असल्याने सर्वांनी काही काळ त्याच बागेतील सावलीत काही काळ विश्रांती घेतली. तर शुभमला झोप येत नसल्याने इतर मित्रांसमवेत तो जवळच असलेल्या पत्र्याच्या शेड वजा गोठ्यात खेळत होता. काही काळाने इतर मित्र निघून गेले. परंतु शुभम हा एकटाच खेळत होता.

दरम्यान गोठ्यात बैलाला बांधण्यासाठी असलेल्या म्होरकी बरोबर तो एकटाच खेळत असताना त्यामध्ये त्याचे डोके अडकले, आणि तसाच तो लटकला गेला. आणि त्याला कळायच्या आताच गळ्याला फास लागून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. दुपारी त्याचे घरातील व्यक्ती उठल्यानंतर त्याला जेवणासाठी हाक मारीत असताना तो कोठेच आढळून आला नाही. त्यामुळे त्या शेड मध्ये डोकावून पहिले असता तो त्या म्होरकीला लटकलेल्या अवस्थेत दिसून आला. त्यास त्वरित उतरून खाली घेतले. तसेच सासवड येथील ग्रामीण रुग्णालयात त्यास उपचारासाठी आणले असता त्यास तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत झाल्याचे सांगितले.


Web Title: Unfortunate death of a young boy to get hanged
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.